आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशात उन्हाच्या तडाख्याने मरणाऱ्या चिमण्या पाहून राबवली मोहीम, पावणेचार लाख परळ वाटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा (मध्य प्रदेश)- उन्हाळ्याचे दिवस होते. दोन चिमण्या झाडावरून खाली पडल्या. एकीचा मृत्यू झाला होता. हे दृश्य पाहून मनाला इतक्या वेदना झाल्या की, पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. स्वखर्चाने सायकलवर फिरून त्यांनी गावागावात पाणी भरून ठेवण्यासाठी परळ वाटले.  गेल्या २० वर्षांच्या प्रवासात त्यांनी ३ लाख ८१ हजार परळ लोकांना वाटले. याद्वारे हजारो पक्ष्यांचा जीव वाचला. ही मोहीम अद्यापही सुरू आहे. दरवर्षी पाच हजार परळ वाटण्याचा त्यांचा संकल्प आहे. ही माेहीम राबवण्यासाठी आता अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या  आहेत.  


पक्षी व निसर्गोपासक शंखपुष्पी महाराज दरियावसिंह असे यांचे नाव आहे. मध्य प्रदेशातील शाजापूरजवळील बिगरोद गावचे राहणारे दरियावसिंह २००९ पासून खंडव्यातील नर्मदानगरात वास्तव्यास आहेत. नर्मदानगर येथे आयटीआयमध्ये प्रशिक्षण अधिकारी म्हणून काम करतात.  


दरियावसिंह म्हणाले, १९९८ च्या आधीपासूनच माझ्याकडे ७० जनावरे होती. या जनावरांना चारण्यास नेले असता, वाटेत एका झाडाखाली विश्रांतीस बसलो. तेवढ्यात  झाडाच्या फांदीवरून दोन चिमण्या खाली पडल्या. दोघींनाही पाणी पाजले. पण एक चिमणी दगावली. तेव्हा मला खूप वाईट वाटले. तेव्हाच निश्चय केला की, या पक्ष्यांचे जीव आपण वाचवले पाहिजेत. ही मोहीम अद्यापही सुरू आहे. दरवर्षी पाच हजार पाण्यासाठी मातीचे कटोरे वाटण्याचा संकल्प आहे. बालाघाटपासून परळ वाटण्याची मोहीम सुरू केली. तेव्हा माझ्याकडे पैसेही नव्हते. १ रुपये प्रतिनग दराने १०० मातीची भांडी विकत घेतली. सायकलवर फिरून गावागावात ती भांडी वाटली. लोकांनी माझी खिल्ली उडवली. पण ही मोहीम थांबवली नाही. मध्य प्रदेशाशिवाय अन्य राज्यांतही मातीची भांडी पाठवली.  पक्ष्यांना प्रथिने मिळावीत म्हणून या भांड्यात भुईमुगाच्या शेंगा टाकण्यात येतात. १ एप्रिल ते ५ जूनपर्यंत ही माेहीम सुरू राहते. यादरम्यान पाच हजार पात्रे वाटतो. दरियावसिंह त्यांच्या पगारातील काही रक्कम वाचवून ही मोहीम राबवतात. भारतात चिमण्यांची संख्या खूप कमी होत चालली आहे. या चिमण्यांचा जीव वाचून दुसऱ्यांनाही यासाठी प्रेरणा देऊ, असा माझा प्रयत्न आहे,  असे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...