आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा लोकांच्या मृत्यूनंतर शोपियामध्ये तणाव; दोन महिन्यांच्या सुटीनंतरही शाळा बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो... - Divya Marathi
सांकेतीक फोटो...

श्रीनगर-  जम्मू-काश्मीरमधील शोपिया येथे सोमवारी परिस्थिती तणावपूर्ण होती. रविवारी रात्री भारतीय लष्कराच्या मोबाइल चेक पोस्टवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांसह सहा लोक मारले गेले. यातील चाैघांचे मृतदेह रविवारी रात्री तर दोघांचे साेमवारी सकाळी आढळून आले. लष्कराने दहशतवाद्यांबरोबरच घटनेत मारल्या गेलेल्या चौघांना दहशतवाद्यांचे मदतनीस असल्याचा दावा केला आहे. परंतु स्थानिक नागरिक यास निर्दोष तरुण असल्याचे सांगत आहेत. लष्कराच्या कारवाईवरून राजकीय वादही निर्माण झाला आहे. भाजपसह सत्तारूढ पीडीपीसह नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस व माकपाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही, असा सूर सर्व राजकीय पक्षांनी आळवला. दस्तुरखुद्द महबुबा मुफ्ती यांनी मृत तरुण आम नागरिक असल्याचे सांगत शोकसंवेदना व्यक्त केली आहे. दरम्यान, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत, असे भारतीय लष्कराने म्हटले. जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक एस.पी. वैद्य यांनीही चार नागरिक दहशतवाद्यांचे मदतनीस होते की नाही, याचा तपास केला जात असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सहा नागरिक ठार झाल्याचा दावा करत फुटीरवाद्यांनी सोमवारी काश्मीरमध्ये बंद पाळला. शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. काश्मीरमध्ये मोबाइल, इंटरनेट आणि रेल्वेसेवा स्थगित ठेवण्यात आली होती.


सोमवारी आढळले दोन मृतदेह

रविवारी रात्री ८ च्या सुमारास एका कारमधून लष्कराच्या मोबाइल चेक पोस्टवर गोळीबार झाला. प्रत्युतरात जवानांनी दोन कारवर गोळीबार केला. लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी अमीर अहमद मलिक व मदतनीस सोहेल खलील,महमद शाहिद खान व शहानवाज अहमद यांचे मृतदेह रात्री सापडले. 

 

दोन महिन्यांच्या सुटीनंतरही शाळा बंद; परीक्षा स्थगित
शोपियामध्ये सहा नागरिक ठार झाल्याचा दावा करत फुटीरवाद्यांनी सोमवारी काश्मिरात बंद पाळला. यामुळे शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. दोन महिन्यांच्या सुटीनंतर सोमवारपासून शाळा सुरू होणार होत्या. पण त्या सुरू झाल्या नाहीत. काश्मीर विद्यापीठाने सोमवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षाही स्थगित केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...