आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा एकेकाळी होता दबदबा, तेथे आज महिला करताय हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दंतेवाडा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात दंतेवाड्यातील स्वयंपूर्ण झालेल्या आदिवासी महिलांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रशासनाच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे येथील महिलांना ई-रिक्षांद्वारे रोजगार मिळाला. हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. शहरात आदिवासी महिला रस्त्यावर ई-रिक्षा चालवताना दिसत आहेत. शहरातील अंतर्गत भागात एकेकाळी फक्त माओवाद्यांच्या शिट्ट्यांचा आवाज ऐकू येत होता. आता प्रवाशांना नेण्यासाठी या महिला शिट्टी वाजवत आहेत. ई-रिक्षांमुळे पर्यावरणाचे रक्षण होते आहे. या महिला ई-रिक्षा चालवून स्वावलंबी झाल्या आहेत. 


उदा. १ : बदलते जग, कॉन्व्हेंटमध्ये शिकते आहे मुलगी  
चितालंका येथील सविता साहू लग्नानंतरही एकटी राहून उदरनिर्वाह करत होती. सविताला ४ वर्षांची मुलगी आहे. सवितासमोर रोजगाराची समस्या होती. मुलीचे भवितव्य घडवण्याचे आव्हान होते. सविता काही कामे करून पैसे मिळवत होती. परंतु घर चालवण्यासाठी ही रक्कम अपुरी पडत होती. तिने ई-रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. आता मुलीला इंग्रजी शाळेत प्रवेश दिला. 


उदा. २ : आईवडिलांच्या मृत्यूनंतर खाण्यापिण्याचे वांधे  
सुकमती भास्कर धुरली गावात राहते. आई-वडिलांचा अकाली मृत्यू झाला. तिच्यावर लहान भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आली. रोजगाराचे साधन नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? ही गंभीर समस्या होती. तिला ई-रिक्षाची माहिती मिळाली. तिने तत्काळ ई-रिक्षाच्या गटात सहभाग घेतला. ई-रिक्षामुळे चांगला रोजगार मिळू शकेल, याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. आज सुकमती धुरली ते दंतेवाडादरम्यान २५ किलोमीटर परिसरात ई-रिक्षा चालवते. यातून दररोज ४०० ते ६०० रुपये उत्पन्न मिळते, असे तिने सांगितले.  


उदा. ३: आधार हवा होता, आज कुटुंबाचाच अाधार बनली  
दंतेवाडा ब्लॉकमध्ये खूप दुर्गम भागात कावडगाव आहे. येथील समलो पोयामीला पतीने सोडले होते. माहेरी आल्यानंतर समलो आईवडिलांवर अवलंबून होती. समलो म्हणाली, मला मैत्रिणीच्या मदतीने  स्वयंसहायता गटात सहभागी होता आले. ई-रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.  समलो आता कावडगाव येथील सर्व दूध डेअरीचे दूध डब्यात भरून दंतेवाडा येथील क्षीरसागर युनिटमध्ये घेऊन येते. दिवसभर शहर व परिसरातील गावातून ई-रिक्षा चालवते. आज उपजीविकेसाठी तिचे सर्वात मोठे योगदान मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...