आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-द.कोरियात ११ करार, अयोध्येत राणी सुरीरत्ना यांचे भव्य स्मारक होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत तसेच दक्षिण कोरिया यांच्यात मंगळवारी सुरक्षा, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यापार अशा एकूण ११ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. त्यात व्यापार, सांस्कृतिक, विज्ञान, तंत्रज्ञान सहकार्य इत्यादी क्षेत्रांत सहकार्य करण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेई यांच्यात ११ सामंजस्य करार झाले. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून यांच्या भारत भेटीचा मंगळवारी तिसरा दिवस होता. 


उभय नेत्यांतील ही बैठक हैदराबाद हाऊसमध्ये झाली. भारत-दक्षिण कोरिया यांच्यातील समग्र सहकार्य उपक्रमाला २०१० मध्ये सुरुवात झाली होती. त्यानंतर उभय देशांनी विविध क्षेत्रांत परस्परांना सहकार्य केले. दोन्ही देश समित्यांच्या मार्फत अनेक क्षेत्रांत माहितीची देवाणघेवाण करून द्विपक्षीय संबंधाला आणखी प्रोत्साहन देतील. भारत-दक्षिण कोरिया यांच्यात सांस्कृतिक व लोकांमधील संपर्काच्या पातळीवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 
राष्ट्राध्यक्ष मून जेई यांचा पुढाकार, भारत भेटीचा तिसरा दिवस, व्यापार-सांस्कृतिक संबंध वृध्दींगत करणार 


सामंजस्य करार 
- व्यापक आर्थिक सहकार्य करार (सीईपीए) अंतर्गत सागरी उत्पादनाच्या व्यापारास सुलभ करण्यावर सहमती. 
- व्यापार संकटावर उपाययोजना. कचरा, अनुदान तसेच परस्पर उत्पादन शुल्क. 
- संरक्षणविषयक निर्णयावर चर्चा तसेच सहकार्य समिती स्थापन करणार. 
- भावी रणनीतीसाठी तज्ज्ञ गट. आधुनिक तंत्रज्ञानाधारित वाणिज्यविषयक योजनांचा समावेश. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा, स्मार्ट फॅक्ट्री, थ्री-डी प्रिंटिंग, इलेक्ट्रिक वाहन, ज्येष्ठांसाठी अत्याधुनिक उपकरणे व किफायतशीर आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य. 


मून यांच्यामुळे कोरिया प्रांतात शांतता : पंतप्रधान नरेंद्र मोदी 
कोरियाच्या प्रांतात शांती प्रक्रिया सुरू करण्याचे श्रेय राष्ट्राध्यक्ष मून यांना जाते. ईशान्य तसेच दक्षिण आशियातील अण्वस्त्र प्रसार हे प्रश्न भारतासाठी चिंतेचा विषय आहे. त्यासाठीच्या शांती प्रक्रियेत भारतही सक्रिय सहभागी आहे. एक पक्षकार या नात्याने भारताची भूमिका आहे. तणाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही निश्चितपणे करू. त्यासाठी दोन्ही देशांतील संपर्क वाढवण्यावर देखील सहमती झाली आहे. 


सुरीरत्ना अयोध्येची राजकुमारी, द. कोरियाच्या राजकुमाराशी विवाह 
राष्ट्राध्यक्ष मून यांनी नोएडा येथील कार्यक्रमात भारत व कोरियाचे संबंध दोन हजार वर्षांपासूनचे असल्याचे सांगितले. हुर हाेंग-ऑक यांना सुरीरत्ना नावानेही आेळखले जाते. त्या मूळच्या अयोध्येच्या. पौराणिक कथेनुसार त्यांचे आई-वडील यांना एक स्वप्न पडले होते. त्यात मुलीचा विवाह दक्षिण कोरियातील राजकुमाराशी होईल, असे सांगितले होते. सुरीरत्न इसवी सन ४८ मध्ये बोटीने दक्षिण कोरियाला गेल्या होत्या. तेथे त्यांचा विवाह राजकुमार किम सुरो ऑफ कारक क्लानशी झाला. तेव्हा सुरीरत्नांचे वय १६ वर्षे होते. त्यांना राज्याची पहिली राणी मानले गेले. अयोध्येत राजकुमारीचे स्मारक आहे. त्याच्या दर्शनासाठी कोरियातून खूप लोक येतात. त्यांची समाधी किंहाईमध्ये आहे. २०१५ मध्ये मोदी दक्षिण कोरियाच्या भेटीवर गेले होते. अयोध्येत राजकुमारीचे मोठे स्मारक होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...