आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयोध्या- २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अयोध्या मंदिराच्या नावावर श्री रामराज्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेला कारसेवकपुरम येथे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने साधू-संतांची उपस्थिती होती. हा रथ सहा राज्यांतून ४१ दिवसांत सुमारे ६ हजार किमींचा प्रवास करेल.
रथयात्रेचा समारोप केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये होईल. यात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद व महाराष्ट्रातील संस्था श्री रामदास मिशन युनिव्हर्सल सोसायटीने केले आहे. रथयात्रेचे संघटना समर्थन करते. परंतु सक्रिय नाही, असे विहिंपचे अवध प्रांताचे समन्वयक शरद शर्मा यांनी स्पष्ट केले. बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करणे असा यात्रेमागील उद्देश आहे. समारोप रामनवमीच्या दिवशी २५ मार्चला होईल. सोसायटीचे राष्ट्रीय महासचिव श्री शक्ती शांतानंद महर्षी म्हणाले, देशात रामराज्य यावे, असे लोकांना वाटते. भगवान राम १४ वर्षांनंतर अयोध्येत परतले होते. त्याचप्रमाणे सरकारने २०१९ पर्यंत १४ महिन्यांत मंदिर बांधले पाहिजे. याअगोदर १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती.
उद्देश- यात्रेद्वारे ५ मागण्या, १० लाख सह्या घेणार
रथयात्रेच्या समारोपानंतर तिरुवनंतपुरमचे प्रसिद्ध पद्मनाभ मंदिराच्या समोर रामराज्य संमेलन हाेणार आहे. त्यात रामराज्याची स्थापना, राम जन्मभूमीवर भव्य राममंदिराचे बांधकाम, रामायणाला शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेणे, रविवारऐवजी गुरुवारी एक दिवसाची सार्वजनिक सुटी तसेच एक दिवस विश्व हिंदू दिनाची घोषणा इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. यात्रेदरम्यान मागणीच्या समर्थनार्थ १० लाखांहून अधिक लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील.
राजकारण- रथयात्रेमुळे भाजपची निवडणूक तयारी
रथयात्रेच्या आयोजनामागे राजकीय अर्थ काढला जाऊ लागला आहे. रामराज्य रथयात्रेला २०१९ च्या लोकसभा निवडणूक व त्याहीपूर्वी कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तयारीशी जोडले जात आहे. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस सरकार आहे. इतर राज्यांत भाजपचे सरकार आहे. ही राज्ये हिंदूबहुल आहेत. त्यामुळे रथयात्रेच्या माध्यमातून हिंदू मतदारांवर प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचा भाजपला निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
खर्च- ४५ दिवसांत २५ लाख रुपयांत तयार रथ
रामराज्य रथयात्रेसाठी विशेष रथ तयार करण्यात आला आहे. रथनिर्मितीसाठी २५ लाख रुपये खर्च आला आहे. रथाची निर्मिती प्रक्रिया गेल्या ४५ दिवसांपासून सुरू होती. हा रथ २८ फूट लांब आहे. रथाचा वरील भाग लाकडी आहे. रथामध्ये राम-सीता व हनुमान यांच्या मूर्ती विराजमान आहेत. रथयात्रेत दक्षिण भारतातील प्रमुख संत स्वामी कृष्णानंतर सरस्वती देखील सहभागी होतील. रथाला २८ गोलाकार रेखीव स्तंभ आहेत. ही रथयात्रा म्हणजे अयोध्येतील प्रस्तावित भव्य राम मंदिराचा एक प्रकारे नमुना आहे.
यात्रा नाशिकमधून जाणार
रामराज्य रथयात्रा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू अशी काढण्यात येईल. यात्रा पुढील प्रमुख शहरांतून जाईल . उत्तर प्रदेश : अयोध्या, लखनऊ, वाराणसी, अलाहाबाद, चित्रकूट, मध्यप्रदेश : भोपाळ, इंदूर, छत्तरपूर, सागर, आेंकारेश्वर, उज्जैन. महाराष्ट्र : नाशिक. कर्नाटक : बंगळुरू, म्हैसूर, बेल्लारी. तमिळनाडू : रामेश्वरम. केरळ : तिरुवनंतपुरम. यात्रेच्या समारोपानंतर रथाला रामदास मिशन युनिव्हर्सल संघटनेच्या तिरुवनंतपुरम येथील मुख्यालयात सुरक्षित ठेवण्यात येईल. तेथून २०१९ मध्ये रथ अयोध्येला पाठवण्यात येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.