आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील महानगरांवर हल्ल्याची चिथावणी; अल-कायदाच्या म्होरक्याचे मनसुबे जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- काश्मीर जिंकण्यासाठी भारताला युद्धभूमी करण्याचे अल कायदाचे विखारी मनसुबे जाहीर झाले आहेत. एका चित्रफितीद्वारे ही माहिती मिळाली आहे. काश्मीरवरील भारताची पकड ढिली करण्यासाठी कोलकाता, बंगळुरू, दिल्लीसारख्या महानगरांवर हल्ले करून हिंसाचार घडवण्याचा कट अल कायदाने केल्याचे व्हिडिआेतून स्पष्ट झाले आहे.  


इस्लामिक स्टेटसह अल कायदाने भारतातील महानगरांना लक्ष्य करण्याचे मनसुबे केले आहेत. मंगळवारी रात्री (२६ डिसेंबर) अल कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या उसामा मेहमूद याच्या व्हिडिआे मुलाखतीतून हे उघड झाले आहे. दहशतवादी संघटनांनी काश्मिरातील संतप्त तरुणांशिवाय देशभरात आपल्या कारवाया वाढवण्याचे ठरवले आहे.  


अल कायदाच्या नेहमीच्या पद्धतीने विविध कॅमेऱ्यांच्या साहाय्याने एका बंद खोलीत ही मुलाखत चित्रित करण्यात आली आहे. सुमारे ४२ मिनिटांच्या म्होरक्याच्या मुलाखतीतून इशारेवजा भाषा वापरण्यात आली आहे. ‘जिहाद इन काश्मीर : वे अँड डेस्टिनेशन’ असे शीर्षक असलेला हा व्हिडिआे आहे.  


वास्तविक अल कायदा गेल्या अनेक वर्षांपासून भारतात घुसखोरी आणि कारवायांसाठी प्रयत्न करत आहेत. परंतु अल कायदाच्या या उपखंडातील गटाला त्यात यश आलेले नाही. काश्मीर प्रदेशात अगाेदरच पाकिस्तानचा पाठिंबा असलेले लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमद, हिजबुल मुजाहिदीन यासारख्या संघटना सक्रिय आहेत. त्यामुळे अल कायदा वाढवण्यासाठी अनेक वर्षांपासून संधी मिळत नव्हती.  


अस्खलित उर्दूतून  चिथावणी  
अल कायदाचा उपखंडातील गटाचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्या असलेल्या मेहमूद व्हिडिआेतून आपले मनसुबे अस्खलित उर्दूतून सांगत होता. भारतीय उपखंडात अल कायदाच्या कारवाया वाढवण्यावर मेहमूदने मुलाखतीतून अधिक भर दिला आहे. मेहमूद मूळचा पाकिस्तान वंशाचा आणि इस्लामाबादचा आहे.  


हल्ल्याचे दिवास्वप्न  
काश्मीर मिळवायचे असल्यास अगोदर कोलकाता, बंगळुरू, नवी दिल्ली येथील महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य करा. हल्ले घडवा. त्यातून काश्मीरमधील भारताची सुरक्षा पकड कमकुवत होईल. ही सुरक्षा यंत्रणा इतरत्र तैनात होईल, असा तर्क म्होरक्याने लावतानाच काश्मीर मिळवण्याचे दिवास्वप्नही दहशतवाद्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने काश्मीरच्या सुरक्षेसाठी ६ लाख जवान तैनात ठेवले आहेत, असा मेहमूदचा दावा आहे.  


३ डिसेंबरला हल्ल्याचे पोस्टर  
अल करार नावाच्या अन्य एका दहशतवादी गटाने ३ डिसेंबर रोजी भारतात हल्ले करण्यात येणार असल्याचे पोस्टरदेखील जारी केले आहे. इसिसनेदेखील अशा धमक्या दिल्या आहेत.  

बातम्या आणखी आहेत...