आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या 72 उमेदवारांची यादी जाहीर होताच कर्नाटकात पक्षांतर्गत असंतोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७२ उमेदवारांची पहिली यादी रविवारी उशिरा जारी केली होती. यानंतर पक्षांतर्गत असंतोषाचा सूर दिसून आला. भाजप प्रदेश प्रवक्ते एन. आर. रमेश यांनी पार्टीतील बंडखोरांच्या भूमिकेचे समर्थन करत बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. राज्यात १२ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच तणाव दिसत आहे.  


चिकपेट मतदारसंघातून रमेश यांना तिकीट नाकारल्याने सर्वप्रथम नाराजी व्यक्त करण्यात आली. रमेश यांनी मतदारसंघात बंदचे आवाहन करण्याचा प्रयत्न केला. रमेश यांच्या एका समर्थकाने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, इतर समर्थकांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे.  


सत्तारूढ काँग्रेसचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचे काम आपण केले होते. भाजपने तिकीट देण्याचे आश्वासन दिले, मात्र ते पाळले नाही, असे रमेश म्हणाले. त्यांनी प्रदेश प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या दोन दिवसांत आपण पुढील कारवाईविषयी ठरवणार आहोत. दरम्यान, भाजपच्या कर्नाटक निवडणूक प्रभारींनी उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत संधी देण्याचे आश्वासन दिल्याचे रमेश म्हणाले.  


केंद्रीय मंत्री अनंत कुमार माझ्याविरुद्ध : रमेश यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री अनंत कुमार त्यांना तिकीट न देण्याविषयी आग्रही आहेत. माजी पोलिस महानिदेशक बी. एन. गुरुदाचार यांचे पुत्र उदय गुरुदाचार यांना तिकीट मिळवून  देण्यासाठी अनंत कुमार प्रयत्न करत आहेत.  

 

येत्या दोन दिवसांत ६५ ते ७० उमेदवारांची यादी जाहीर होणार  

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार  बी. एस. येदियुरप्पा यांनी सांगितले की, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत रविवारी ७२ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. येत्या दोन दिवसांत ६५ ते ७० उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. त्यांनी आपल्या ‘ऑटोरिक्षा अभियाना’ची सुरुवात सोमवारी केली. या दरम्यान ते ऑटोरिक्षा चालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकतील. आगामी निवडणुकीसाठी भाजपने १०० पेक्षा अधिक ऑटोरिक्षांना प्रचार अभियानात सामील केले आहे. 

 

हे आहेत भाजपचे बिनीचे उमेदवार
राज्यातील वरिष्ठ भाजप नेता जगदीश शेट्टार यांना हुबळी धारवाड, के. एस. ईश्वराप्पा यांना शिमोगा विधानसभा क्षेत्रातून मैदानात उतरवण्यात आले आहे. भाजपने लोकसभा सदस्य बी. श्रीरामुलू यांनाही निवडणूक मैदानात उतरवले आहे. वरिष्ठ पक्षनेते जे. पी. नड्डा यांनी ही यादी बैठकीनंतर जारी केली.  

 

काँग्रेसचे पुनरुत्थान कर्नाटकातूनच होणार : कोळीवाड  
काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. बी. कोळीवाड यांनी काँग्रेसचे पुनरुत्थान करणारी विधानसभा निवडणूक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस पक्षावर संकट आल्यानंतर कर्नाटकनेच पक्षाचे पुनरुत्थान केले आहे, याला इतिहास साक्षी असल्याचे कोळीवाड म्हणाले. १९७७ मध्ये इंदिरा गांधी पराभूत झाल्यानंतर कर्नाटकानेच काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. इतिहासाची पुनारावृत्ती होईल, असे ते म्हणाले. २०१३ पेक्षा अधिक जागांवर १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला जागा मिळतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले.

 

सिद्धरामय्या मतदारसंघ बदलणार? : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, अशी शक्यता येदियुरप्पा यांनी वर्तवली. त्यांना  येथून पराभूत होण्याचे भय आहे. ते समर्थकांच्या दबावाचे कारण देत जागा बदलण्याच्या प्रयत्नांत आहेत. सिद्धरामय्या यांचे पुत्र यतेंद्रदेखील वरुणा मतदारसंघाऐवजी सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत, असा दावा येदियुरप्पा यांनी केला आहे.  

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...