आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Born In The Arunachal Pradesh Due To Land Acquisition, Bomaja Was The Richest Village

भूसंपादन मावेजामुळे अरुणाचलचे बोमजा रात्रीतून बनले आशियातील सर्वात श्रीमंत गाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटानगर, अरुणाचल- शासकीय मावेजामुळे अरुणाचल प्रदेशमधील बोमजा गावाने एका दिवसातच आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ख्याती मिळवली. तवांग जिल्ह्यातील या गावात पाच वर्षांपूर्वी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. मोबदला मात्र गुरुवारी देण्यात आला. संरक्षण मंत्रालयातर्फे येथील जमिनीवर लोकेशन प्लॅन युनिट उभारले जाणार आहे. २००.०५६ एकर जमिनीच्या अधिग्रहणाच्या मोबादल्यात सरकारने ३१ कुटुंबांना ४०.८० कोटी रुपये दिले. यात २९ कुटुंबांना प्रत्येकी १.०९ कोटी रुपये दिले गेले. एका कुटुंबाला २.४५ कोटी, तर दुसऱ्या एका कुटुंबाला ६.७३ कोटी रुपयांचा निधी मिळाला.   


मोबदल्याचा निधी मिळाल्यानंतर गावातील प्रत्येक कुटुंब कोट्यधीश झाले आहे. प्रत्येक कुटुंब कोट्यधीश असणारे बहुधा आशियातील हे पहिले गाव आहे. राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मोबदल्याचे चेक वितरित केले. या भागातील रहिवासी आणि ४ गढवाल रायफल्सचे रायफलमॅन जसवंत सिंह यांनी १९६२ च्या युद्धात शहीद होण्यापूर्वी चीनच्या ३०० जवानांना यमसदनी धाडले होते. तवांग रोडवर त्यांच्या नावाचे एक मंदिर आहे. जवानांचे देव म्हणून त्यांची पूजा केली जाते.   
या भागातील काही लोकांनी जमिनीच्या अधिग्रहणाला विरोध केला होता. ५० वर्षांपूर्वी जमीन अधिग्रहण करून मावेजा न मिळाल्याने ते नाराज होते, परंतु मागील वर्षी एप्रिल महिन्यात संरक्षण मंत्रालयाने सेंगे, न्यूकमाडुंग, लिश गावातील १३२ कुटुंबांना ५४ कोटी रुपये दिले.

 

तवांग-बोमजा महत्त्वाचे
तालुक्यातील १५ गावांपैकी बोमजा बोंगखार हे एक महत्त्वाचे गाव आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर धोरणात्मक दृष्टीने याचे महत्त्व आणखीनच वाढले. हे गाव तवांगहून ५०, तर भूतान सीमेवरून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे. चीनची आक्रमकता पाहता भारतीय सैन्याने त्यांची पकड मजबूत केली आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...