आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात गरीब गाव अंचलात आता होतेय काजू शेती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरंगपूर (ओडिशा)- ओडिशाच्या नवरंगपूर जिल्ह्यातील अंचला गाव. हा देशातील सर्वात गरीब भाग आहे. पण आता येथे समृद्धीची पावले दिसत आहेत. त्याची पहिली झलक दिसली हरी मांझींच्या घरात. अंगणात मक्याचे पीक आहे. काका बुदुसन मांझींच्या घरातही एका खोलीत मका भरला आहे. हे कुटुंब धानाची शेतीही करते आणि मक्याचीही. धानामुळे पोट भरते आणि मक्यामुळे इतर गरजांची पूर्तता होते. मात्र, मक्याचे दर काही वर्षांपासून वाढण्याऐवजी कमी होत आहेत. त्यावर उपाय म्हणजे उत्पादन वाढवणे. आधी एक एकरात १२-१५ क्विंटल मका होत होता, पण आता नवी पद्धत अवलंबल्याने २० क्विंटल होत आहे. हरी आणि बुदुसन यांनी ३५ आणि ४० हजार रु. चे कर्ज बँक आणि सावकाराकडून कर्ज घेतले आहे. ते फिटेल असा विश्वास आहे.  


आणखी एक गोष्ट ग्रामस्थ शिकले आहेत ती म्हणजे काजूची शेती. प्रत्येक शेतात काजूची झाडे दिसतात. आम्ही गावातील भोला पात्राच्या शेतात पोहोचलो. तेथे काजूचे पीक तयार होत आहे. भोला आनंदाने सांगतो की, बाजारात काजू १०० रुपये किलोने विकतो. आता मजुरीसाठी बाहेर जाणार नाही. बाहेर गेल्यावर मुलांचे शिक्षण आणि प्रकृतीची काळजी वाटते. मी तीन वर्षांपूर्वी काजूची ४० झाडे लावली होती. आता सर्वजण काजू लावत आहेत. गावातील २१ हेक्टर क्षेत्रात काजू लावला आहे. २५० कुटुंबांच्या गावात १०० कुटुंबे ही शेती करत आहेत. काजूसाठी पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही. २-३ वर्षांत झाडाला फळे येतात. गावात तीन-चार वर्षांआधी अशी स्थिती नव्हती. १०० पेक्षा जास्त कुटुंबांतील लोक धान आणि मक्याच्या शेतीनंतर जानेवारी-फेब्रुवारीत हैदराबाद आणि चेन्नईला मजुरीसाठी जात होते. या दिवसांत गाव रिकामे होत होते. गावाच्या सरपंच निलेंद्री बत्रा यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून बाहेर जाणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. या वर्षी तर फक्त १०-१२ लोकच मजुरीसाठी चेन्नई आणि हैदराबादला गेले आहेत. 


अंचला गावात आजही रस्ता नाही, परिवहन सुविधा नाहीत. ८००-१००० लोकसंख्येनुसार शिक्षणही नाही आणि आरोग्य सुविधाही नाही. गावातील लोकांचे म्हणणे आहे की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी फक्त ४ शिक्षक आहेत. १५ गावांची पंचायत असूनही आरोग्य सुविधेच्या नावावर फक्त एक महिला कर्मचारी आहे. 


प्राथमिक आरोग्य केंद्राच्या २ खोल्यांपैकी एक तर पंचायत भवन म्हणून वापरली जात आहे. गावातील अर्जुन बत्रा आणि दुर्जन यांनी सांगितले की, मनरेगात लोक काम करतात, पण अंगठा टेकवून कोणी दुसरेच पैसे काढून घेतात. त्यामुळे लोक गावाच्या बाहेर किंवा दुसऱ्या भागात दररोज कामासाठी जातात. या गावात २० वर्षांत कधी मुख्यमंत्री आले नाहीत. ५ वर्षांपासून खासदार, आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही चेहरा दाखवला नाही. परिस्थिती अशी आहे की फक्त ८ किमी दूर असूनही उमरकोट ब्लॉकचे बीईओही दोन वर्षांपासून आले नाहीत.