आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकातील शपथविधी समारंभामध्ये भाजपविराेधी 11 पक्षीय नेत्यांची एकजूट; माेदींकडून शुभेच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू -  धर्मनिरपेक्ष जनता दल व काँग्रेस अाघाडीचे सरकार अखेर बुधवारी कर्नाटकात सत्तारूढ झाले. एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेसचे जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कार्यभार सांभाळणाऱ्या कुमारस्वामी यांच्या शपथविधीस देशभरातील भाजपविराेधी ११ पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थित राहून एक प्रकारे माेदी सरकारविराेधात एकजूट दाखवत अागामी लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपला अाव्हानच दिले.

 

या साेहळ्यात यूपीएच्या अध्यक्षा साेनिया गांधी व बसपा अध्यक्षा मायावती बराच वेळ एकत्र दिसल्या. दाेघींनी एकमेकींना अालिंगनही दिले.  तिसऱ्या अाघाडीसाठी अनुकूल असणाऱ्या ममता बॅनर्जी याही साेनियांसाेबत दिसल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अखिलेश यादव व अांध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासमवेत चर्चा करताना दिसले. 
उत्तर प्रदेशातील एकेकाळचे कट्टर राजकीय वैरी अखिलेश व मायावती हेही प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांशी भेटताना दिसले.  या शपथविधी साेहळ्यास चार विद्यमान व माजी मुख्यमंत्री सहभागी झाले हाेते.

 

उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण, मात्र प्रचारामुळे गैरहजर  
भाजपविराेधी सर्वच घटक पक्षांच्या प्रमुखांना यानिमित्ताने एकत्र अाणण्याचा प्रयत्न काँग्रेसने यशस्वी करून दाखवला. ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही माजी पंतप्रधान देवेगाैडा यांनी फाेन करून शपथविधीचे निमंत्रण दिले हाेते. मात्र, पालघर पाेटनिवडणुकीतील प्रचारात व्यग्र असल्यामुळे उद्धव जाऊ शकले नाहीत. त्यांनी फाेनवरूनच शुभेच्छा दिल्या,’ अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

 

पावसाचे शुभसंकेत
शपथविधी समारंभाच्या ४५ मिनिटे अाधी मुसळधार पाऊस झाला हाेता. व्यासपीठाचा काही भागही पावसाच्या पाण्यात बुडाला हाेता. मात्र, त्यानंतरही समर्थक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. शपथविधीला पावसाने शुभसंकेत दिल्याचे कुमारस्वामी म्हणाले.

 

माेदींकडून शुभेच्छा
परदेश दाैऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही कुमारस्वामी यांना शुभेच्छा दिल्या. कर्नाटकातील भाजप नेते येदियुरप्पा यांनी मात्र अाजचा दिवस कर्नाटकातील ‘काळा दिवस’ असल्याचे सांगून काँग्रेस व जेडीएसमधील नाराज नेत्यांना भाजपत येण्याचे अावाहन केले.
परदेश दाैऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही कुमारस्वामी यांना शुभेच्छा दिल्या. कर्नाटकातील भाजप नेते येदियुरप्पा यांनी मात्र अाजचा दिवस कर्नाटकातील ‘काळा दिवस’ असल्याचे सांगून काँग्रेस व जेडीएसमधील नाराज नेत्यांना भाजपत येण्याचे अावाहन केले.

 

 

बातम्या आणखी आहेत...