आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात भाजपला झटका: जयानगरमध्ये काँग्रेस विजयी, काँग्रेस-जेडीएसचे संख्याबळ 120 वर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांनी भाजप उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा सुमारे तीन हजार मतांनी पराभव केला. - Divya Marathi
काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांनी भाजप उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा सुमारे तीन हजार मतांनी पराभव केला.

बंगळुरू- कर्नाटकमध्ये काँग्रेसने विधानसभेची आणखी एक जागा आपल्या खिशात घातली आहे. दक्षिण बंगळुरू (शहर) मधील जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराचा तीन हजार मतांनी पराभव करत विधानसभेत आणखी एका आमदाराची भर घातली आहे. काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांनी भाजपच्या उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा सुमारे तीन हजार मतांनी पराभव केला. सौम्या यांना 54 हजार 457 मते तर भाजपच्या प्रल्हाद यांना 51 हजार 568 मते मिळाली. 

 

कर्नाटकात मागील महिन्यात 12 मे रोजी विधानसभा निवडणूक झाली होती. मात्र, जयानगरमधील भाजपचे उमेदवार बीएन विजयकुमार यांचे मतदानाआधीच निधन झाले. त्यामुळे तेथील मतदान रद्द करण्यात आले होते. त्यानंतर यासाठी 11 जून रोजी जयानगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. त्यात 55 टक्के मतदान झाले होते.

 

भाजप उमेदवार विजयकुमार यांचे निधन झाल्याने त्या ठिकाणी भाजपने त्यांचे बंधू बी. एन. प्रल्हाद यांना रिंगणात उतरवले होते तर काँग्रेसकडून पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांची कन्या सौम्या रेड्डी यांना तिकीट दिले. सध्या कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल (एस) यांच्या आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आपल्या पक्षाचा उमेदवाराचा अर्ज मागे घेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 

 

काँग्रेस-जनता दल (एस) यांचे आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच एकत्र आले होते. याआधी राजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मुनीरत्ना यांनी विजय खेचला होता. तेथे भाजप दुस-या तर जनता दल (एस) तिस-या स्थानावर फेकला गेला होता. त्यामुळे कुमारस्वामी यांनी जयानगरमध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्यात धन्यता मानली.

 

कुमारस्वामी यांनी 24 मे रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधी पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपच्या बीएस येड्डीयुरप्पा यांना 55 तासातच मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. 

 

224 आमदारांच्या कर्नाटक विधानसभेत सध्या काँग्रेसकडे 80, भाजपकडे 104 तर जनता दल (एस) कडे 37 जागा आहेत. बसपाचा एक आमदार तर दोन अपक्ष आमदार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...