आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रालोआसोबतची आघाडी तोडणार नाही; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करू; तेलगू देसम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती (आंध्र प्रदेश)- भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असलेली आघाडी तोडणार नाही, असे घूमजाव तेलगू देसम पक्षाने रविवारी केले. पक्षाचे खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांची दुपारी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री वाय. एस. चौधरी यांनी ही घोषणा केली. आंध्र प्रदेश आणि केंद्रात भाजप आणि तेलगू देसमची आघाडी आहे.


केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला पुरेसा निधी मिळाला नसल्याने तेलगू देसम पक्ष नाराज असून तो रालोआसोबतची आघाडी तोडू शकतो, अशी शक्यता व्यक्त झाली होती. काही नेत्यांनी तसा इशाराही दिला होता. त्यानंतर पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चौधरी म्हणाले की, आमचा पक्ष रालोआसोबतची आघाडी तोडणार नाही. आम्ही आधी केंद्र सरकारसमोर राज्याचे प्रश्न मांडू आणि ते सोडवून घेण्याचा प्रयत्न करू. केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही संसदेत आणि संसदेबाहेरही निदर्शने करू.भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची नायडू यांच्याशी चर्चा झाली आहे का, या प्रश्नाला चौधरी यांनी नकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले की, नायडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता, पण अशी चर्चा झालीच नाही.


‘केंद्रावर दबाव टाका’
सूत्रांनी सांगितले की, चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाच्या खासदारांना रालोआ सरकारवर दबाव टाकण्यास सांगितले आहे. २०१४ मध्ये राज्याच्या विभाजनाच्या वेळी जी आश्वासने देण्यात आली होती त्यांचा सन्मान व्हायला हवा यासाठी खासदार दबाव टाकतील. राज्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, असे नायडूंनी खासदारांना बजावले आहे. नायडूंनी केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल नाराजी दर्शवत म्हटले की, चार अर्थसंकल्प पाहिल्यानंततरही आम्ही चूप कसे राहू शकतो किंवा धीर धरू शकतो?

बातम्या आणखी आहेत...