आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधार’ न जोडल्यास विमा, पीएफची रक्कम अडकणार, फोन बंद होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली, इंदूर- केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सेवा, लाभ आणि कोणत्याही प्रकारच्या सबसिडीसाठी आधार क्रमांक ३१ मार्चपर्यंत लिंक करणे अनिवार्य आहे. ३१ मार्चनंतर जर तुमचा मोबाइल क्रमांक, बँक खाते, जीवन विमा किंवा मेडिक्लेेम पॉलिसी, स्वयंपाकाच्या गॅसचा क्रमांक हे आधार कार्डशी लिंक नसतील तर या सेवा बंद होऊ शकतात. अनेक मंत्रालयांंनी १३९ सेवा आधारशी लिंक करण्याचे सर्क्युलर गेल्या डिसेंबरमध्ये जारी केले होते. या योजना आधारशी लिंक करण्याचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय काय होईल, अशी विचारणा ‘भास्कर’ने यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण यांच्याकडे केली तेव्हा ते म्हणाले की, अशा प्रकारचे निर्णय आणि सर्क्युलर जारी करण्याची जबाबदारी संबंधित मंत्रालय, विभाग आणि राज्यांची आहे. ३१ मार्चनंतरचा निर्णयही याच संस्था करतील. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असलेले कॅबिनेट मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी चर्चा केली असता, आधार कार्डशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्यामुळे यावर अधिकृत टिप्पणी करणार नाही, असे त्यांनी सांगितले.


आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कर्करोग आणि डायलिसिस तसेच यादीतील गंभीर आजार योजनांत आर्थिक मदत घेण्यासाठी आधार लिंक करा, असे रुग्णांना सांगितले जात आहे. हा नियम ३१ मार्चनंतरही लागू राहावा, असा प्रयत्न केला जाईल. आधार लिंक नसल्यास त्यांची आर्थिक मदत रोखली जाऊ शकते, पण उपचार थांबणार नाहीत. जेव्हा या योजना आधारशी लिंक केल्या जातील तेव्हा उर्वरित पूर्ण रक्कम रुग्णांना दिली जाईल.

 

एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंतिम मुदतीपर्यंत आधार लिंक केले नाही तर पॉलिसीशी संबंधित सेवा प्रभावित होतील. कोणीही आपल्या एलआयसी पॉलिसीचा हप्ता भरू शकेल, पण तो पॉलिसीचे विड्रॉल किंवा मॅच्युअर पॉलिसीची रक्कम घेऊ शकणार नाही. दुसरीकडे, वित्त मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, निश्चित मुदतीपर्यंत बँक खाते आधारशी लिंक केले नाही तर अडचण येऊ शकते. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टनुसार बँक खाते सीज केले जाईल. बँक खात्यात पैसे जमा करू शकाल, पण या खात्यातून विड्रॉल, इंटरनेट ट्रान्जॅक्शन किंवा ई-पेमेंट होऊ शकणार नाही.


एचआरडी मंत्रालयाने सांगितले की, आधार लिंक न केल्यास कोणताही शैक्षणिक शिष्यवृत्ती रोखली जाऊ शकते. पण आधार लिंक झाल्यानंतर शिष्यवृत्तीची थकित रक्कम परत केली जाईल. दूरसंचार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ३१ मार्चनंतर आधार लिंक नसलेले मोबाइल क्रमांक अनिश्चित काळासाठी बंद केले जातील. ३१ मार्चनंतर आधार लिंक करण्याची तारीख वाढण्याबाबत जवळपास सर्व मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांनी एकच मत दिले आहे. त्यांनी सांगितले की, न्यायालय किती लवकर आपला अंतिम निकाल देणार आहे त्यावर हे सर्व अवलंबून आहे. जर न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत आपला अंतिम निकाल दिला नाही तर मंत्रालयांना योजनांशी आधार लिंक करण्याची तारीख वाढवावी लागेल. मंत्रालयांनी तसे केले नाही तर लोक आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करतील.

 

मोबाइल क्रमांक - टोल फ्री क्रमांकाने करा लिंक
दूूरसंचार कंपन्यांनी आधारला प्रीपेड मोबाइल लिंक करण्यासाठी १४५४६ टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. येथे क्रमांक, नाव, जन्मतारीख यांसारखी माहिती द्यावी लागेल. नंतर ओटीपी मागितला जाईल, तो ३० मिनिटांसाठी मान्य असेल. तो टाकल्यानंतर आधार लिंक होईल. पोस्टपेड युजर्सना सर्व्हिस प्रोव्हायडरकडे जावे लागेल. तेथे आधार आणि फिंगरप्रिंटद्वारे मोबाइल क्रमांकाचे सत्यापन होईल. तसे न केल्यास ३१ मार्चनंतर क्रमांक बंद होऊ शकतो.

 

बँक खाते - ऑनलाइन लिंक करू शकता
बँकेत जाऊन खात्याची माहिती आणि आधार कार्डची प्रत देऊन लिंक करू शकता. ऑनलाइनही लिंक करू शकता. स्टेट बँकेचे खातेदार आधार क्रमांक आणि खाते क्रमांक लिहून ५६७६७६ वर मेसेज करू शकतात. एसबीआयसह काही बँका एटीएमच्या माध्यमाने आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा देत आहेत. त्यासाठी एटीएममध्ये कार्ड स्वाइप करून पिन टाका आणि नंतर ‘सर्व्हिस रजिस्ट्रेशन’चा पर्याय निवडा. या मेन्यूत आधार कार्ड नोंदणीचा पर्याय निवडा.

 

स्वयंपाकाचा गॅस - बुकिंग क्रमांक डायल करा
त्यासाठी तुम्ही संबंधित गॅस डीलरकडे जाऊन आधार क्रमांकाची प्रत देऊ शकता किंवा तुम्ही ज्याप्रमाणे मोबाइलने गॅसची नोंदणी करता त्या कंपनीचा बुकिंग क्रमांक डायल करा, त्यात आधारशी लिंक करण्याचा पर्यायही विचारला जातो, तो फॉलो करून तुम्ही आधार कार्ड लिंंक करू शकता. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला जोडणीवरील सबसिडीचा लाभ मिळणार नाही. जोडणी ब्लॉकही होऊ शकते.

 

विमा - पाॅलिसी क्रमांक, जन्मतारीख सांगावी लागेल
विमा योजनेच्या वेबसाइटवर जाऊन आधार लिंक करा. कंपनीच्या सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये जाऊनही हे काम करू शकता. बहुतांश प्रकरणांत फक्त पॉलिसी क्रमांक आणि जन्मतारीख द्यावी लागेल. व्हेरिफिकेशन होईल. एलआयसी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स आणि मॅक्स लाइफ इन्शुरन्स ऑनलाइन लिंकिंगची सेवा देत आहेत.

 

म्युच्युअल फंड - सर्व फंड जोडावे लागतील
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर ज्या फंड हाउसकडून म्युच्युअल फंड घेत असाल त्याच्याशी आधार जोडावे लागेल. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त फंड हाउसचे म्युच्युअल फंड अाहेत तर तुम्हाला त्या सर्व फंड हाउसशी आधार जोडावे लागेल.

 

पॅन कार्ड - प्राप्तिकरच्या संकेतस्थळावर जा
पॅन कार्डला लिंक करण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जावे लागेल. पॅन आणि आधार कार्ड डिटेल्स सबमिट करा आणि अॉथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. त्यासाठी तुमचे रिटर्न भरणारे सीए किंवा कर सल्लागाराशी बोलावे, तो ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करेल.

 

वाहन परवाना - जुने मान्य, रिन्यूत अनिवार्य
परिवहन विभागात आधार अपडेट नसलेले फक्त जुने परवाने मान्य असतील, पण त्यांच्या नूतनीकरणासाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. नवा परवाना बनवण्यास आधार कार्ड लागेलच. नवे आणि जुने वाहन खरेदी करण्यासाठीही आधार कार्ड द्यावे लागेल.

 

डेबिट/ क्रेडिट कार्ड - कस्टमर केअरला कॉल करा
क्रेडिट आणि डेबिट कार्ड लिंक करण्यासाठी संबंधित बँकेच्या कस्टमर केअर सेवेचा लाभ घेऊ शकता. ते तुमच्या माहितीचे सत्यापन करून आधार क्रमांकाची माहिती घेतील आणि ते जोडतील. संबंधित कार्ड जारी करणाऱ्या बँक शाखेत जाऊन तेथेही ही प्रक्रिया करू शकता अन्यथा नंतर कार्ड ब्लॉक होऊ शकते.

 

 

पीएफ- वेबसाइटवर ऑनलाइन लिंक करा
पीएफला आधार जोडण्यासाठी पीएफच्या संकेतस्थळावर जा. युनिव्हर्सल अकाउंट नंबर आणि पासवर्डने लॉगइन करा. मागवलेली माहिती देऊन आधार लिंक करा. पोस्ट ऑफिसद्वारे सुरू असलेल्या विविध योजनांनाही आधारने लिंक करायचे आहे. तेथे खाते किंवा पॉलिसी संयुक्त नावावर असेल तर दोघांचे आधार क्रमांक लागतील.

 

रेशन कार्ड- दुकानावर आधारची प्रत द्या
सार्वजनिक वितरण प्रणालीच्या दुकानावर जाऊन तेथे तुम्ही आधार कार्डची प्रत देऊ शकता. गरज असेल तर ते त्याचे सत्यापन करतील आणि नंतर लिंक केले जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...