आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात 2017 मध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण 900 पार, हजार मुलांमागे जन्मल्या 914 मुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- मुलींना ओझे समजून गर्भातच हत्या करण्यासाठी बदनाम झालेल्या हरियाणासाठी दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात पहिल्यांदाच मुलींच्या जन्माचे प्रमाण ९०० च्या पुढे गेले आहे. हरियाणा सरकारच्या लैंगिक जन्मदर आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये मुलींचा जन्मदर १००० मुलांमागे ९१४ नोंदला गेला आहे. “बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा नारा देणाऱ्या हरियाणासाठी लैंगिक गुणोत्तर प्रमाणातील हे मोठे यश आहे.  


१७ जिल्ह्यांत मुलींच्या जन्मदराची संख्या ९०० हून जास्त झाली आहे. २०१७ मध्ये राज्यात कोणत्याही जिल्ह्यातील आकडा या बाबतीत ८८० पेक्षा खाली आला नाही. विशेष म्हणजे, २०११ च्या जनगणनेनुसार, राज्यात १ हजार मुलांमागे ८३४ मुली होत्या. पानिपत ९४५ स्त्री जन्मदरासोबत अव्वलस्थानी आहे. यानंतर यमुनानगरमध्ये हा आकडा ९४३ आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार, महेंद्रगड, रेवाडी, सोनिपत व झज्जर  जिल्ह्यात स्त्री-पुरुष जन्मदर प्रमाण  ८०० पेक्षा खाली होता. आता त्यांच्या लैंगिक जन्मदर प्रमाणातही अनुक्रमे १३६,९१,९६ अंकांची सुधारणा झाली आहे.  


२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “बेटी बचाओ-बेटी पढाओ’ मोहिमेची सुरुवात केली होती. मोहीम सुरू होताना राज्यात २० पैकी १२ जिल्ह्यांत लैंगिक गुणोत्तर प्रमाणाची वाईट स्थिती होती. मात्र, तीन वर्षांत राज्य सरकारने अनेक पावले उचलली. स्त्री भ्रूणहत्येसाठी जबाबदार आरोपींना अटक करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. शेजारचे राज्य व या राज्यात १२६ ठिकाणी छापे टाकून आरोपींविरुद्ध ५५० एफआयआर नोंदवण्यात आले.  


भिंडमध्ये ७.४% सुधारणा

घटत्या मुलींच्या संख्येचा कलंक मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्याने पुसला आहे. तिथे २०१७ मध्ये १००० मुलांमागे ९२९ मुली जन्मल्या.जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार लैंगिक गुणोत्तर प्रमाण ८५५ होते. या हिशेबाने भिंडमध्ये स्त्री-पुरुष प्रमाणात ७.४% सुधारणा झाली. जनजागृती,कठोर कारवाई व सरकारच्या स्त्री शिक्षण व विवाह योजनांमुळे यात सुधारणा झाली आहे.  

बातम्या आणखी आहेत...