आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालूंच्या सेवेसाठी स्वयंपाकी, नोकराने अटक करवून घेतली;विश्वासू लक्ष्मण, मदन तुरुंगात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना काय काम दिले जावे, याचा निर्णय तुरुंग प्रशासनाला अद्याप घेता आलेला नाही तर विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, लालू तुरुंगात जाण्याच्या दोन तास आधीच सेवा करण्यासाठी त्यांचा खास स्वयंपाकी लक्ष्मणकुमार व नोकर मदन यादव यांनी स्वत:वरच गुन्हे दाखल करवून घेत तुरुंग गाठला आहे. तुरुंगात जाण्यासाठी यांची निवड अशासाठी करण्यात आली की, हे दोघेही रांचीचे रहिवासी आहेत. लालूंचे विश्वासू नोकर आहेत. तुरुंगात जाण्याची यांची ही पहिलीच वेळ नाही. मागच्या खेपेसही लालू तुरुंगात गेले तेव्हा त्यांची सेवा करण्यासाठी मदनही तुरुंगात गेला होता. ही चित्रपटात शोभून दिसावी अशी घटना आहे.  


२३ डिसेंबर २०१७ राेजी सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू असताना लालू तुरुंगात जातील, असा रागरंग दिसू लागला तेव्हाच लालूंच्या समर्थकांनी या दोघांची रवानगी तुरुंगात करून लालूंची सेवा करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. या दोघांच्या विरोधात लोअर बाजार पोलिस ठाण्यात कलम ३४१, ३२३, ५०४,३७९, ३४ नुसार गुन्हे दाखल आहेत. दोघांचे पत्ते गंगा खटाल हिनू, साकेतनगर असे दिले आहेत.  या दोघांनाही तुरुंगात कोठे ठेवण्यात आले ते समजू शकले नाही.

 

मारहाणीच्या बनावट प्रकरणात तुरुंगवारी

मदन आणि लक्ष्मण यांना तुरुंगात पाठवण्यासाठी मारहाणीचे बनावट प्रकरण रचण्यात आले. यासाठी मदनने त्याचा शेजारी सुमीत यादवला तयार केले. त्याने मदन व लक्ष्मणवर मारहाण व १० हजार रुपये लुटीची फिर्याद डोरंडा पोलिस ठाण्यात दिली. डोरंडाच्या पोलिस ठाणे प्रमुख आबिद खान यांना संशय आला. त्यांनी अशा किरकोळ घटनेत अटक करून तुरुंगात पाठवण्यास नकार दिला. मग तिघे लोअर बाजार पोलिस ठाण्यात गेले.  

 

घाईघाईत एफआयआर आणि लगेच शरणागती  

सुमीत यादव यांनी पोलिस ठाण्यात एक पानावर तक्रार लिहून दिली की, उधारी मागितल्यावरून मदन व लक्ष्मण यांनी  मारहाण केली व खिशातून १० हजार रुपये चोरून नेले. तक्रार प्राप्त होताच एफआयआर दाखल झाला. त्यानंतर विधिज्ञाने पोलिस ठाण्यातून प्रत मिळवून घाईघाईत सत्र न्यायालयात दोघांना हजर राहण्यास सांगितले. त्याच दिवशी लालू ४.३० वाजता तुरुंगात पोहोचले. त्यांचे सेवक २.३० वाजताच तुरुंगात दाखल झाले होते.  

 

 

स्वयंपाकी लक्ष्मण 

लालूंना ओळखणाऱ्यांत लक्ष्मण हे परिचित नाव आहे. २४  तास त्यांच्या सेवेत असलेल्या दोन नोकरांपैकी हा एक आहे. पाटण्याहून दिल्लीपर्यंत लालूंसाठी तो स्वयंपाक बनवतो. त्यांची इतर कामेही करतो.  

 

रांचीचा लक्ष्मण...मदन  

लालूंसाठी रांचीमध्ये लक्ष्मणचे काम राजद कार्यकर्ता मदन यादव पाहतो. खूप आधीपासून तो हिनू येथे राहून दुधाचा व्यवसाय करतो. मागील खेपेस लालू होटवार तुरुंगात असताना हाही त्यांची सेवा करण्यासाठी तुरुंगात गेला होता.

बातम्या आणखी आहेत...