आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअबूझमाड- देशासाठी छत्तीसगडचे अबूझमाड क्षेत्र एक कोडेच आहे. तेथील ९०% गावे बाहेरच्या कोणीही पाहिली नाहीत. किती गावे, किती लोकसंख्या, किती घरे; सर्व अंदाज आहे. ५ हजार चौ. किमीतील अबूझमाड भागात २०६ गावे आहेत, असे म्हणतात. नारायणपूर जिल्ह्याचा ७०% भाग अबूझमाडमध्ये येतो. एकीकडे बिजापूर आणि दुसरीकडे महाराष्ट्राची सीमा आहे. हे न पाहिलेले जग पाहण्यासाठी दिव्य मराठी टीम जटवर गावात पोहोचली. या गावात बाहेरची कोणतीही व्यक्ती आली नाही. आदिवासींच्या प्रतिमेप्रमाणे आता येथे लोक अर्ध्या कपड्यांत राहत नाहीत. मुले फुलपँट, बर्म्युडा, टी-शर्ट घालतात. मुली सलवार-कुर्ता, लेगिंग्ज घालतात. येथे वीज तर सोडाच, हातपंपही नाही. पण देशातील सर्वात दुर्गम जंगल अबूझमाडमध्ये ज्ञानाचा प्रकाश पोहोचत आहे. बाहेरील सीमेवर काही गावांत शाळा आणि अंगणवाड्या आहेत. आत घनदाट जंगलांतील गावांतून मुले पायी चालत येथे येत आहेत. त्यासाठी त्यांना १० किमी जावे-यावे लागते. म्हणजे शिकण्यासाठी ते रोज २० किमी चालतात.
जटवर नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात आहे. नारायणपूरपासून ४१ किमी दूर. शासकीय सुविधा शून्य. चोवीस तास सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीची सवय आता लोकांना झाली आहे. सुविधा, संपन्नता भलेही दिसत नसली तरी आयुष्य आनंदी होत आहे. मेहनती लोक पहाड खोदून धान पिकवत आहेत. पिण्याचे पाणीही नदी, नाल्यांतून आणत आहेत. पण आता ते गाळून घेत आहेत. आनंदी वातावरणामुळे १०-१० वर्षांपासून बंद घोटूल म्हणजे त्यांनी बनवलेले पंचायत भवनही उघडले आहेत. तेथे दुपारी ज्येष्ठ आणि संध्याकाळी मुले-मुली नृत्याचा आनंद घेतात. आम्ही जटवरला पोहोचलो तेव्हा ३३ कुटुंबांच्या या गावात उत्सवी वातावरण होते. युवक-युवती, ज्येष्ठ आणि मुले सर्व बाहेर जाण्याच्या तयारीत होते. पुरुषांजवळ लढाऊ कोंबडे होते, तर महिलांच्या हातात मातीची भांडी. या भांड्यांत होती सल्फी (बस्तरची बिअर) व तांदळापासून बनलेली लांदा (दारूचा प्रकार). सर्वांना जवळच्या कोहकामेटा गावात पोहोचण्याची घाई होती कारण तो बाजारचा दिवस होता. रस्ता कठीण होता, पण त्याची पर्वा नाही. तेथे साहित्य विकले तरच पैसे मिळतील. पण अडचण ही आहे की त्यांना हिशेब येत नाही. कोहकामेटा बाजारात कुटुंबासोबत आलेले उमो माडिया यांनी शेठला ३ पोती धान दिले. शेठने त्याला २२० रु. दिले. उमो आनंदात निघाला. हिशेब जाणण्याचीही गरज वाटली नाही.
सुरक्षा दलांशिवाय फक्त दिव्य मराठी टीम पोहोचली
अबूझमाडमध्ये नक्षली कारवाया अशा आहेत की दिव्य मराठी टीमसोबत नारायणपूरहून आलेले स्थानिक लोक सरहद्दीपासून १५ किमी अलीकडे सोडून निघून गेले. टीमने कादूल येथून प्रवेश केला. पोंडापारमार्गे कोहकामेटाला पोहोचले. कोहकामेटा नक्षली भाग आहे. नदी पार करताना पाहून बकरी चारणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले की, जटवरला जाऊ नका. पण आम्ही पोहोचलो. येथे कोणी बाहेरची व्यक्ती येऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. कोहकोमटा येथून मुडेर आणि भंडारी गावात जाण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थांनी जाऊ दिले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.