आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी पक्षांचे म्हणणे मान्य केल्यास भाजपला मिळतील फक्त चार जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा -  कर्नाटक निवडणुकीनंतर देशभर मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष एकजूट होत आहेत, पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ)एकजूट दिसत नाही. गुरुवारी रालोआच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी पाटण्यात एकत्र रात्रभोजन केले. त्यात भाग घेण्यास राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (रालोसपा) अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी नकार दिला. त्यांच्या मते, ही रालोआची बैठक नाही. त्यात बहुतांश जिल्हा पदाधिकारी आणि राज्याचेच नेतृत्व सहभागी झाले. आमची राज्य नेतृत्वाशी नव्हे, तर केंद्रीय नेतृत्वाशी बोलणी झाली आहे. आम्ही बिहार भाजपच्या अध्यक्षांशी चर्चा करत नाही. रालोआची बैठक बोलवावी, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच बोलावतात, असे कुशवाहा यांचे म्हणणे आहे.  


या नाराजीमागे  राज्यात लोकसभा निवडणुकीचे जागावाटप असल्याचे म्हटले जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक वर्ष आधीच राज्यात जागावाटपावरून वक्तव्ये सुरू आहेत. बैठकीआधी जदयूचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. त्यागी म्हणाले की, ‘रालोआची बिहारमध्येच नाही तर देशातही स्थिती खूप वाईट आहे. जदयूला त्रास दिला जात आहे. जदयूने बिहारमध्ये भाजपला सत्तेत भागीदार बनवले.’

 

आघाडी धर्मासाठी भाजपच्या १८ खासदारांना सोडावी लागेल जागा  

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. येथे रालोआत ४ पक्ष आहेत. २०१४ मध्ये भाजपने २९ जागा लढवून २२ जागा मिळवल्या होत्या. त्याचा सहकारी पक्ष लोजपने ७ जागा लढवून ६ जागा जिंकल्या होत्या. रालोसपाने ४ जागा लढवून ३ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा रालोआपासून वेगळ्या जदयूने ४० जागा लढवल्या होत्या, फक्त २ जिंकल्या होत्या. भाजपने पुढील लोकसभा निवडणुकीत सहकारी पक्षांचे म्हणणे मान्य केल्यास त्या पक्षाला फक्त चारच जागा मिळतील. म्हणजे त्याला आपल्या १८ विद्यमान खासदारांची तिकिटे कापावी लागतील.

 

भाजप-जदयू : सरकारच्या स्थापनेनंतर पहिली बैठक  

बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे सरकार बनल्यानंतर प्रथमच रालोआच्या नेत्यांची बैठक झाली. एकजूट दाखवणे हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीचा उद्देश होता. बैठकीला मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, भाजपचे केंद्रीय नेते भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री सुशील मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय आदी नेते सहभागी झाले होते.  

 

जदयू: २५ जागा लढवतोय, भाजपला द्याव्याच लागतील  

जदयू नेते के. सी. त्यागी म्हणाले की, केंद्रात जदयूला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही आणि रालोआच्या रणनीतीतही महत्त्व दिले जात नाही. भाजपने नितीशकुमारांच्या चेहऱ्याचा सदुपयोग करावा. जदयूचे श्याम रजक म्हणाले की, जदयूची बिहारमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. आम्ही २५ जागा लढवू इच्छितो. त्यांना आम्हाला २५ जागा द्याव्याच लागतील.  

 

लोजपा : ६ जागांबाबत तडजोड करणार नाही 

लोजपा नेते पशुपती पारस म्हणाले की, आम्ही आमच्या जिंकलेल्या ६ जागांवर कुठलीही तडजोड करणार नाही. भाजप रालोआतील सर्वात मोठा पक्ष आहे. आघाडीतील सहकाऱ्यांचे समाधान करणे त्याची जबाबदारी आहे. काही दिवसांपूर्वी रामविलास पासवान आणि अमित शहांची भेट झाली होती. रालोसपा अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनीही योग्य जागा मिळतील, असे म्हटले आहे.  

 

शहा यांच्याशी चर्चेनंतरही शिवसेना ठाम, २०१९ मध्ये स्वतंत्र लढणार  
भाजप अध्यक्ष अमित शहांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. तत्पूर्वी, शहांनी म्हटले होते की, आम्ही शिवसेनेसोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवू. पण त्याचा शिवसेनेवर काही परिणाम झाला नाही. शिवसेनेने गुरुवारी स्पष्ट केले की, आम्ही स्वबळावर २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवू. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, आगामी सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केला आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही. बुधवारी दोन्ही नेत्यांत दोन तास अनेक मुद्द्यांवर चांगली चर्चा झाली. अमित शहांनी पुन्हा भेटू, असे म्हटले. आम्हाला शहांचा अजेंडा माहीत आहे. उद्धव ठाकरेंनी गुरुवारी पालघरमध्ये सभाही घेतली.  

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...