आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांची महाआघाडी लोकसभा निवडणुकीनंतर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थितीनुसार राष्ट्रीय स्तरावर महाआघाडी स्थापन होईल, असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे इतक्यात विरोधकांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  


येचुरी म्हणाले, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची महत्त्वाची भूमिका असेल व हे पक्ष आघाडी करून मैदानात उतरू शकतात. प्रादेशिक पक्षांबाबत प्रत्येक राज्याचे स्वतंत्र सूत्र असू शकते. असे असले तरी भाजपविरुद्ध निवडणूक निकाल आल्यानंतर सर्व पक्षांनी एका मंचावर यावयास हवे. यानंतरच महाआघाडीची मोट बांधली जाईल.  


विरोधकांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा विचार केल्यास त्याची आत्ताच आवश्यकता नाही. २००४ मध्ये भाजपने अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले होते. विरोधकांनी तशी घोषणा केली नव्हती. मात्र, काँग्रेसचे मनमोहनसिंग पंतप्रधान झाले व ते देशातील बळकट पंतप्रधानांपैकी एक होते.  


पक्षनेत्यांसोबत कार्यक्रम व धोरणावर चर्चा केल्यानंतर येचुरी यांनी पत्रकारांना सांगितले की, ही वेळ विरोधकांना मजबूत करण्याची आहे. लोक खुल्या विचाराने भाजपविरुद्ध विरोधी उमेदवारास पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी लोकांची मुळीच इच्छा नाही. डावे पक्ष विरोधकांना एकजूट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. ही मोहीम सुरू झाली आहे. त्याचे यशस्वी परिणाम येत आहेत. कर्नाटक सरकारची स्थापना विरोधकांच्या एकजुटीचा परिणाम आहे.

 

सर्व क्षेत्रांत पीछेहाट
मोदी सरकारने चार वर्षांत देशाची पीछेहाट केली. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बँकिंग प्रणालीवरील विश्वास उडाला आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या असल्याचा आरोप येचुरी यांनी केला.

 

बातम्या आणखी आहेत...