आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबिकापूर - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आमच्या सरकारच्या ४ वर्षांचा हिशेब का मागत आहेत? राहुल गांधी यांच्या कुटुंबाच्या ४ पिढ्यांनी देशावर ५५ वर्षे राज्य केले. मग तरीही विकास का झाला नाही, असा प्रश्न भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी विचारला. आम्ही राहुल यांना कुठलाही हिशेब देणार नाही, पण मते मागण्यासाठी गेल्यावर आम्ही जनतेला मात्र प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक पैशाचा हिशेब देऊ, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
छत्तीसगडमध्ये वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या प्रचाराची अनौपचारिक सुरुवात अमित शहा यांनी रविवारी केली. अंबिकापूर येथे झालेल्या जाहीर सभेत शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. शहा म्हणाले की, भाजपने केलेल्या विकासकामांचा हिशेब मागण्याआधी राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. तुमच्या कुटुंबातील ४ पिढ्यांनी देशावर ५५ वर्षे राज्य केले. मग तरीही विकास का झाला नाही? याचे उत्तर राहुल यांनी आधी द्यायला हवे. मोदी सरकारने दर पंधरवड्याला गरीब, शेतकरी आणि मागासांसाठी नवीन योजना सुरू केल्या.
उन्हाळा सुरू झाला की राहुल गांधी सुटीसाठी युरोप आणि इटलीत जातात. राहुल जेव्हा येथे मते मागण्यासाठी येतील तेव्हा त्यांच्या पक्षाने विकास का केला नाही, असा प्रश्न तुम्ही विचारणार की नाही, असा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थितांना विचारला. शहा म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सीमेपलीकडून दररोज गोळीबार होत असे, पण त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात नसे. पण मोदी सरकारने २०१४ मध्ये सूत्रे हाती घेतल्यापासून ही स्थिती बदलली आहे. उरी येथे दहशतवादी हल्ल्यात १२ जवान ठार झाले. त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधीही मिळाली नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या जवानांना सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी पाकिस्तानमध्ये पाठवले.
छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आणि विधानसभेच्या ९० जागांपैकी ६५ जागा भाजपला मिळतील, असा दावाही केला.
अमित शहा यांचा रोड शो; उत्स्फूर्त स्वागत
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘विकास यात्रा’ काढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमित शहा यांनी रविवारी अंबिकापूर येथे रोड शो केला. त्या वेळी ढोल-ताशांच्या गजरात शहा यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ५ किमीचा हा रोड शो ४५ मिनिटे चालला. लोकांचीही दुतर्फा रस्त्यावर गर्दी होती. या रोड शोमध्ये मुख्यमंत्र्यांशिवाय गृहमंत्री रामसेवक पैकरा आणि इतर मंत्री सहभागी झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.