आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलानीस्वामींचा विरोधकांवर ठपका; द्रमुकची आज राज्यव्यापी बंदची हाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई -  तुतिकोरिन येथील स्टरलाइट कंपनीचा तांब्याचा प्रकल्प बंद करण्याच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा ठपका मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी विरोधकांवर ठेवला आहे. त्यात आतापर्यंत ३ महिलांसह १३ जणांना प्राण गमावावे लागले आहेत. दुसरीकडे परिसरात तणावाची स्थिती असून द्रमुकने २५ मे रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.  


हिंसाचाराची घटना   अतिशय दुर्दैवी आहे. काही राजकीय पक्षांनी आंदोलकांना फूस लावल्यामुळे ही समाजविघातक घटना घडली. खरे तर विरोधकांनीच जाणूनबुजून ही घटना घडवून आणल्याचा दावाही मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केला आहे. लोकांच्या प्रकल्पाविषयीच्या भावना आम्ही समजूू शकतो. त्यांचा आम्ही आदर करतो. हा प्रकल्प बंद करण्याचा सरकार २०१३ पासून प्रयत्न करत आहे. अगदी अम्मा मुख्यमंत्री असतानादेखील हा प्रकल्प बंद करण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु त्यात यश आलेले नाही. मात्र, स्थानिकांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव आल्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी स्वीकारले. प्रकल्प बंद करण्यासंबंधीच्या याचिका सर्वोच्च व उच्च न्यायालयात आहेत.  

 

गेल्या महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही परवानगी देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. तांब्याचा प्रकल्प बंद करण्यासाठी सरकारने चार ते पाच महिन्यांत स्थानिक नागरिकांसमवेत जवळपास १४ बैठका घेतल्या होत्या. १४ एप्रिलच्या जाहिरातीद्वारे यासंदर्भातील सरकारी कार्यवाहीबद्दलचा तपशील वृत्तपत्रांतून प्रकाशित करण्यात आला होता. त्यामुळे जनतेला याविषयीची शंका दूर करता येऊ शकेल, असे पलानीस्वामी यांनी सांगितले.  

 

पोलिस गोळीबाराचा निषेध  
द्रमुक तसेच सहकारी पक्षांनी शुक्रवारी तामिळनाडू बंद पुकारला आहे. तुतिकोरिनमधील हिंसाचारात १३ जणांना आपले प्राण गमावावे लागले. पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. अगोदर सर्वपक्षीय बंदची तयारी केली होती. परंतु त्याऐवजी द्रमुक व मित्र पक्षांनी २५ मे रोजीचा बंद पुकारल्याचे पक्षाने स्पष्ट केले.  


केंद्राने राज्याकडून अहवाल मागवला   
केंद्राने तुतिकोरिनमधील हिंसाचाराच्या घटनेचा अहवाल तामिळनाडू सरकारकडे मागितला आहे. गृह खाते तामिळनाडू सरकारच्या सतत संपर्कात आहे. तुतिकोरिनमधील घटना खरोखरच वेदनादायी आहे. पीडित तसेच त्यांच्या नातेवाइकांसोबत माझी प्रार्थना आहे. तुतिकोरिनमधील ग्रामस्थांनी शांतता बाळगावी, असे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...