आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रासाठी राफेलचा करार बदलला - राहुल; कर्नाटकात निवडणूक प्रचार सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेल्लारी- मित्राच्या फायद्यासाठी राफेल लढाऊ विमानाचा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: बदलला, असा आरोप राहुल गांधी यांनी बेल्लारी जिल्ह्यातील होसपेट येथे एका जाहीर सभेत बोलताना केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारपासून कर्नाटकात निवडणूक प्रचाराची धूम उडवून दिली. कर्नाटकात येत्या काही महिन्यांतच निवडणुका होत आहेत. मोदी सरकारने फ्रान्सच्या एका कंपनीकडून राफेल विमानाची खरेदी केली. नरेंद्र मोदी यांनी पॅरिस दौऱ्यात स्वत: खरेदीचा करार बदलला. याआधी हा करार एचएएल कंपनीस दिला होता.

 

त्यांच्याकडून हा करार काढून मित्राला दिला. राफेल खरेदीत झालेला भ्रष्टाचार देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, याचा जाब मोदींना जनतेसमोर द्यावाच लागेल, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांचा चार दिवसांचा कर्नाटक दौरा शनिवारपासून सुरू झाला अाहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी त्यांनी भाजपविरोधात आक्रमक बाणा दाखवून दिला. राहुल गांधी म्हणाले, सोनिया गांधी यांचे बेल्लारीशी जवळचे नाते आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत सोनिया गांधी यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना पराभूत केले होते. आम्हाला गरज भासली तेव्हा तुम्ही आम्हाला साथ दिली आणि काँग्रेसला स्वीकारले  याची आठवण त्यांनी करून दिली.  या प्रचार मोहिमेदरम्यान राहुल गांधी यांच्या अनेक जाहीर सभा व प्रचारफेरी आयोजित करण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील अनेक मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार आहेत. 


बॅक मिरर पाहून ड्रायव्हिंग करणारे मोदी 

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅक मिरर पाहून वाहन चालवत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. संसदेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर दोषाचे खापर फोडले होते. उत्तरादाखल राहुल गांधी म्हणाले, देश बॅक मिरर पाहून चालवता येत नसतो. 


पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी, बेरोजगारी, आदिवासी व दलिताच्या प्रश्नावर काहीच भूमिका मांडलेली नाही. ते फक्त भूतकाळावर बोलत आहेत. तुम्हाला भूतकाळ सांगण्यासाठी देशाने पंतप्रधानपद दिलेले नाही, तर तुमच्या भविष्यातील योजना जनतेला जाणून घ्यायच्या आहेत, असा टोला राहुल गांधींनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...