आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमीचा नेता सफदर नागोरीसह 18 जणांना कारावास, स्फोटक पदार्थ अधिनियमांतर्गत दोषी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची - प्रतिबंधित सिमी संघटनेसाठी २००७ मध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण छावणी सुरू केल्याप्रकरणी दोषी ठरवत एनआयएच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी सिमीचा नेता सफदर नागोरीसह १८ जणांना ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.


एनआयए विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती कौसर इडाप्पगात यांनी दोषींना बेकायदा कृत्य, स्फोटक पदार्थ अधिनियम तसेच गुन्हेगारी कटाच्या विविध कलमान्वये वेगवेगळी शिक्षा सुनावली. बेकायदा कृत्य प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १० अंतर्गत दोषींना १ वर्षे सश्रम कारवास व कलम ३८ नुसार ५ वर्षे तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ४ अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. १४ दोषी सात वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने सोमवारी १७ जणांची निर्दाेष मुक्तता केली होती.

 

केरळ पोलिसांनी स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या(सिमी) सदस्यांविरुद्ध केरळधील थांगगपारा येथे डिसेंबर २००७ मध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिर चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने आरोपपत्र दाखल केले होते. त्यात त्यांनी म्हटले की, गुप्त प्रशिक्षण शिबिरात शारीरिक प्रशिक्षण, गोळीबाराचे प्रशिक्षण, स्फोटक पदार्थाचे प्रशिक्षण, मोटारसायकल रेसिंग, रोप क्लायम्बिंग तसेच जिहादचे वर्ग भरवण्यात आले होते. भादंवि कलम १२२ नुसार आरोपींनी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप न्यायालयाने फेटाळला.

 

४८ वर्षीय नागोरीसह दोषी ठरवलेल्यांमध्ये सादुली, पी.ए. शिबिली, मोहंमद अन्सार व अब्दुल साथार(सर्व रा. केरळ) हाफिज हुसेन, मो. सामी बागेवदी, नदीम व मिर्झा अहमद बागी(कर्नाटक), आमील परवेझ व कमरुद्दीन नागोरी(मध्य प्रदेश), मुफ्ती अदुल बशर(उत्तर प्रदेश), दानिश व मनझर इमाम(झारखंड), मो.अबु फेसल खान(महाराष्ट्र) आणि अलम जेब अफ्रिदी(गुजरात) यांचा समावेश आहे.

 

नागोरी सिमीचा संस्थापक सदस्य
नागोरी हा सिमीचा संस्थापक सदस्य असून १९९२ मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर तो कट्टरपंथी झाल्याचे सांगण्यात येते. मध्य प्रदेशातील पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असलेल्या नागोरीविरुद्ध सर्वप्रथम देशविरोधी कारवाया केल्याप्रकरणी १९९८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्य प्रदेशमध्ये २००८ मध्ये अटक होईपर्यंत तो पाेलिसांना गंुगारा देत होता. सरकारने २००१ मध्ये सिमीवर बंदी घातली. लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहंमद, हुरियत अल-जिहाद-ए-इस्लामसारख्या संघटनांना भारतात व अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी सिमी तरुणांचा पुरवठा करत होते.

 

२०१० मध्ये एनआयएकडे तपास : या प्रकरणी २००८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जानेवारी २०१० मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेकड तपास सोपवण्यात आला. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये सुनावणी सुरू होऊन ३३ आरोपींना अहमदाबाद, दिल्ली, भोपाळ, बंगळुरू तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीस हजर करण्यात आले. दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...