आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता- भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिलेले उद्दिष्ट गाठण्यात पश्चिम बंगालमधील पक्षाच्या नेत्यांना सध्या तरी अपयश आल्याचे दिसत आहे. पक्षातील अंतर्गत वाद आणि समन्वयाचा अभाव हे घटक त्यासाठी कारणीभूत आहेत.
आपला पक्ष तृणमूल काँग्रेसशासित पश्चिम बंगालमध्ये स्थिर वाटचाल करत आहे, असे मत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातील एका गटाचे आहे, पण काही कारणांमुळे अजूनही पक्षाला तेथे चांगला जम बसवता आलेला नाही, असे चित्र दिसत आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या विविध निवडणुकांत भाजपच्या मतांमध्ये चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे भाजप आता सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला आव्हान देणारा प्रमुख पक्ष म्हणून उदयास येत आहे.
भाजपचा मतांचा वाटा १८ टक्के झाल्याबद्दल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच प्रदेश भाजपच्या नेतृत्वाची पाठ थोपटली आहे, पण मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी आणखी खूप प्रयत्न करावे लागतील, अशी कबुली पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर हा नेता म्हणाला, “आम्हाला अजूनही राज्यातील सर्व ७७ हजार मतदान केंद्रांपर्यंत पोहोचायचे आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा या वर्षीच्या सुरुवातीला राज्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी २०१७ च्या अखेरीस मतदान केंद्र समित्यांची स्थापन करण्याचे उद्दिष्ट दिले होते. पण आतापर्यंत उद्दिष्टाच्या फक्त ६५ ते ७० टक्के एवढेच काम झाले आहे.” पक्षातील काही नेत्यांमध्ये अंतर्गत वाद आहेत. सध्याच्या नेतृत्वाबाबत काही नेते समाधानी नाहीत. त्यामुळे ते सक्रिय नाहीत, अशी टिप्पणीही या नेत्याने केली. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी मात्र हे मत खोडून काढले. ते म्हणाले, “समित्यांची स्थापना करण्याचे काम जानेवारी २०१८ पर्यंत पूर्ण होईल.”
उद्दिष्टापासून अजूनही दूरच : दिलीप घोष
राज्यातील सर्व मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ठ गाठता आले नाही, या मताशी प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनीही सहमती दर्शवली. ते म्हणाले, “आम्ही सर्व केंद्रांपर्यंत पोहोचू शकलो नाही, हे खरे आहे. त्यामागे काही कारणेही आहेत. मालदा, मुर्शिदाबाद आणि नादिया या अल्पसंख्याकबहुल जिल्ह्यांत आमचे काही कार्यकर्ते आहेत, पण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अल्पसंख्याकांमधील एक गट आपल्यावर हल्ला करेल, या भीतीने मतदान केंद्रांची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.