आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंकेश हत्या, इन्फाेसिस प्रकरणामुळे कर्नाटक चर्चेत; पुढील वर्षी हाेणाऱ्या निवडणुकीचा वाजला बिगुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- २०१७ मध्ये घडलेल्या पत्रकार व कार्यकर्त्या गाैरी लंकेश हत्या, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फाेसिसच्या संचालक मंडळातील वादामुळे कर्नाटक देशभरात विशेष चर्चेत राहिले. विशेषत: गाैरी लंकेश यांच्या हत्येमुळे जनमानस ढवळून निघाले. यासह राज्यातील विविध विकासकामेदेखील चर्चेत राहिली. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी अागामी वर्षात हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला अाहे. या निवडणुकीवर वरील दाेन्ही मुद्द्यांचा परिणाम हाेण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे चित्र अाहे.   


या वर्षात मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी काँग्रेस नेतृत्वावर केलेला अाराेप, ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या विविध प्रतिष्ठानांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडी व भाजप व पक्षाचे राज्यप्रमुख बी. एस. येदियुरप्पा यांच्यातील वादाचीही चांगलीच चर्चा झाली. यासह वीरशैव-लिंगायत समाजाची असलेली माेठी लाेकसंख्या व या समाजाची वेगळ्या धर्माची मागणी राज्याच्या राजकारणावर परिणाम करू शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात अाहे. तसेच एअायएडीएमकेच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने ठाेठावलेल्या कारावासाच्या शिक्षेचा व कारागृहात त्यांना पुरवण्यात अालेल्या उपचार सुविधेचा मुद्दाही राज्यात चर्चिला गेला. याशिवाय या वर्षी बंगळुरूमधील भारतीय अंतराळ संशाेधन संस्थेने (इस्राे) अवकाशात साेडलेल्या ‘अायअारएनएसएस-१एच’ या उपग्रहाची चाचणी तांत्रिक कारणांमुळे अयशस्वी झाली. इस्राेच्या इतिहासातील ही एक काळी घटना मानण्यात अाली. राज्याची नववर्षाची सुरुवातही बंगळुरू शहरात माेठ्या प्रमाणावर झालेल्या महिला छेडखानीने झाली हाेती. त्याचप्रमाणे तटवर्ती भागातील जिल्ह्यांतील हत्येच्या काही प्रकरणांमुळे  भाजप व सत्ताधारी कांॅग्रेस पक्षात झालेल्या अाराेप-प्रत्याराेपांमुळेही राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे नागरिकांनी पाहिले.   

 

गाैरी लंकेश हत्येमुळे समाजजीवन निघाले ढवळून  
डाव्या विचारसरणीच्या ५५ वर्षीय पत्रकार गाैरी लंकेश यांची दुचाकीवरून अालेल्या अज्ञात हल्लेखाेरांनी ५ सप्टेंबर राेजी हत्या केली हाेती. हिंदुत्ववाद्यांनी त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात अाला हाेता. हिंदूंना लक्ष्य केल्याने त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात येतेय. तथापि, नक्षलींनी त्यांची हत्या केल्याचा संशयही व्यक्त झाला. पाेलिसांनी हल्लेखाेरांचे रेखाचित्रही जारी केले. त्यांच्या माध्यमातून विचारस्वातंत्र्याची हत्या हाेत असल्याचा सूरही निघाला. या घटनेमुळे कर्नाटकातील समाजजीवन ढवळून निघाले हाेते. तसेच देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

बातम्या आणखी आहेत...