आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिमी सिंहभूम- दे शातील सर्वात आजारी जिल्हा म्हणजे झारखंडचा पश्चिमी सिंहभूम. पोडाहाट, सारंडा आणि कोल्हान ही त्याची तीन वन परिक्षेत्रे आहेत. तेथे जंगल एवढे घनदाट आहे की सूर्यकिरणे जमिनीला स्पर्शही करत नाहीत. सुमारे १६ लाख लोक या जंगलात राहतात. आरोग्यसेवांचा अभाव असल्याने दोन लाख कुपोषित मुले आहेत. त्यापैकी ३३ हजारांचा जीव धोक्यात आहे. दीड दशकापासून नक्षलवाद्यांमुळे ही गावे शासकीय यंत्रणेच्या टप्प्याबाहेर आहेत. दुर्गम पहाडांतील या गावातील स्थिती अशी आहे की कोणी आजारी असेल तर खाट म्हणजेच रुग्णवाहिका. पण आता येथील लोक स्वत: डोंगर खोदून रस्ता तयार करत आहेत. गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचावी आणि कोणीही उपचाराविना राहू नये हा हेतू.
पोडाहाट जंगलाच्या झरझरा भागात सिंहभूमच्या सर्वात उंच शिखरावर लांजी गाव आहे. नक्षली भागात २००० फूट उंचीवरील या गावात ७ भागांत ७२५ लोक राहतात. लांजीचे लोक आठवड्यात एकदा सोमवारी पहाडावरून उतरून बाजाराला झरझरा येथे येतात. धान्य, इतर साहित्य घेऊन परततात. मैदानी भागापासून गावापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एक दुर्गम पायवाट आहे. लोकांना येण्या-जाण्यासाठी चार-चार तास लागतात. ग्रामस्थांची सर्वात मोठी अडचण म्हणजे गावापर्यंत दुचाकीही पोहोचत नाही, इतर वाहनांची गोष्टच सोडा. या कारणामुळे ८०% पेक्षा जास्त रुग्णांचे रस्त्यातच निधन होते. पण आता या गावातील आदिवासी गेल्या तीन महिन्यांपासून स्वत: रस्ता तयार करत आहेत. चक्रधरपूरहून ३० किमी दूर होयोहातू पंचायतीच्या लांजी गावात दिव्य मराठी टीम पोहोचली तेव्हा जगन हांसदा यांनी सांगितले की, गावात रुग्णवाहिका यावी म्हणून लोक आता थेट चढणीचा ५ किमी लांब रस्ता तयार करत आहेत.
अशीच कहाणी सारंडाच्या धरनादिरी गावाचीही आहे. तेथे ३ महिन्यांपूर्वी एका वृद्धेच्या मृत्यूने पूर्ण गावाला बदलासाठी प्रेरित केले. तेथील लोकही ६ किमी रस्ता तयार करत आहेत. मुंडा लाखो यांनी सांगितले की, ३ महिन्यांपूर्वी गावातील श्रीराम कश्यप यांची आई आजारी होती. चार-पाच युवक तिला खाटेवरून किरीबुरू आरोग्य केंद्रात नेण्यासाठी निघाले, पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. श्रीराम म्हणाले, याआधीही २२ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर रुग्णवाहिका येणे शक्य व्हावे म्हणून आता ग्रामस्थांनी रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.