आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझंगड (जम्मू-काश्मीर)- जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमधील झंगड गावावर सीमेपलीकडून गोळीबार होणे ही नित्याची बाब आहे. हातबॉम्ब पडत असल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे त्या पुन्हा सुरू करता येत नाहीत. मुलांचे शिक्षण पंचायत भवनच्या मोबाइल स्कूलमध्ये सुरू आहे. येथे पहिली ते आठवी इयत्तेतील मुले एकत्र शिक्षण घेत आहेत. ५ वीपर्यंतच्या मुलांना एक शिक्षक शिकवतात. इतर वर्गातील मुलांची जबाबदारी तीन शिक्षकांवर आहे. शाळेत प्रार्थनेऐवजी शून्य तास असतो.
अन्य एका खासगी शाळेने पाकच्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठी बुलेटप्रूफ खोली तयार केली आहे. शाळेची घंटा वाजताच मुले बुलेटप्रूफ खोलीत जातात. शिक्षकही येतात आणि वर्ग सुरू होतो. दर आठवड्यास हे नित्याचेच झाले आहे. प्राचार्य मनजितसिंग यांनी सांगितले, आमच्या दहावीपर्यंतच्या शाळेत १०० मुले आहेत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांना गोळीबार व बाॅम्बफेक झाल्यानंतर लपण्याचे प्रशिक्षणही दिले आहे.
दिव्य मराठीची टीम गावात पोहोचली, तेव्हा मुले आई, वडिलांसाेबत मुले शाळेत येत होती. घर व दुकानांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. लोकांनी सांगितले, रात्रभर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू केला. ताे पहाटे ३.३० वाजता थांबला. मे महिन्यानंतर घर सोडून नौशेरा येथील छावणीत बहुतांश गावकरी आता परत येत आहेत. येथे राहणाऱ्या चांद हीरचे पुढच्या महिन्यात लग्न आहे. गोळीबार व अशांतता असूनही विवाह होत आहेत. ७३ वर्षीय महिला कैलाश यांनी सांगितले, गोळीबार दररोज होत असतो. आमच्या घराच्या भिंतीवर गोळीबाराच्या खुणा दिसतील. बॉम्बने दरवाजा तुटला आहे. परंतु आम्ही घर सोडून कुठेही जाणार नाही. या गावातील सरपंच संजयकुमार यांच्या पत्नी नौशेरा येथील निर्वासितांच्या छावणीत राहतात कारण त्यांना दोन लहान मुले आहेत. गावातील किराणा दुकानदार अमित सांगतात, सतत घरे सोडून पळून जाण्यापेक्षा आता अनेक लोकांनी घरातच खंदक बांधणे सुरू केले आहे. सरकारकडून अडीच लाखांची मदत मिळते. गरिबांना खंदक बांधणे परवडणारे नाही. पण तेही सर्वजण एकत्र येऊन खंदक बांधत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.