आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा शेतकऱ्यांसाठी टॉप फॉर्म्युला; T-टोमॅटो, O-ओनियन, P-पोटॅटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- निवडणूक होऊ घातलेल्या कर्नाटकात भाजपच्या ९० दिवसांच्या यात्रेच्या समाप्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बंगळुरूत आले. आगामी निवडणुकीत भाजपतर्फे शेतकरीपुत्र बी. एस. येदियुरप्पा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, अशी घोषणा त्यांनी सभेत केली. मोदी म्हणाले की, राज्य सरकार विकासात अपयशी ठरले आहे. आमच्या सरकारने कर्नाटकला २ लाख कोटी रुपये दिले, केंद्रातील काँग्रेसच्या सरकारच्या वेळी फक्त ७० हजार कोटीच मिळत होते. म्हणजे रालोआ सरकारने १८० टक्के जास्त रक्कम दिली आहे. पॅलेस मैदानमधील सभेत मोदी म्हणाले की, ‘केंद्राकडून जास्त निधी मिळूनही कर्नाटकात विकास झाला नाही. शेतकरी दु:खी आहेत. त्यांची दखल घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी टोमॅटो, कांदा, बटाट्याला योग्य दर मिळायला हवा. कर्नाटकात काँग्रेसची उलटगणती सुरू झाली आहे.’ मोदी याआधी ऑक्टोबरमध्ये कर्नाटकला आले होते. २४ जानेवारीला भाजप अध्यक्ष अमित शहांचीही सभा झाली होती. त्यांच्या सभेच्या दिवशी पाणीवादप्रश्नी संघटनांनी राज्य बंद पुकारला होता.  


राजकीय तापमान वाढीस सुरुवात 
भाजपच्या ९० दिवसांच्या परिवर्तन यात्रेच्या समाप्तीनिमित्त पंतप्रधान मोदींची बंगळुरूत सभा झाली. ते म्हणाले, केंद्राने कर्नाटकला १८०% जास्त निधी दिला, पण राज्य बेहाल आहे. आता शेतकरी बटाटे-कांदे-टोमॅटो याद्वारे मजबूत होतील. त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी येदियुरप्पांच्या नावाची घोषणा केली.


बंगळुरूत रेल्वे यंत्रणेसाठी दिले १७ हजार कोटी रुपये  
मोदी म्हणाले की, ‘बंगळुरूत रेल्वे जाळ्यामुळे लोकांना ट्रॅफिक जामपासून मुक्ती मिळेल. रेल्वे यंत्रणेसाठी केंद्राने १७ हजार कोटी रु.ची तरतूद केली आहे.’ राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तिच्या तयारीसाठी येदियुरप्पांच्या नेतृत्वात भाजपने सर्व २२४ मतदारसंघांत यात्रा काढली होती.  


काँग्रेस तयार : राहुल ३ दिवस राज्यात राहतील, भाजप करणार विरोध
कर्नाटकमध्ये मेमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १० फेब्रुवारीपासून आपली मोहीम सुरू करतील. कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर म्हणाले की, राहुल होस्पेटमध्ये १० फेब्रुवारीला सभा घेतील. दुसऱ्या दिवशी बसने कोप्पाल, यादगिरी, रायचूर आणि कलबुर्गीला जातील. १२ फेब्रुवारीलाही प्रचार करतील. भाजपने म्हटले आहे की, शहा आणि मोदींच्या सभेपासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी बंद पाळण्यात आला. पक्ष त्याचे उत्तर देत राहुल यांच्या कार्यक्रमांना विरोध करेल.


उत्तर : केंद्राचा निधीचा दावा काँग्रेसने ठरवला खोटा  
भाजप अध्यक्ष अमित शहांनी दावा केला होता की, केंद्राने कर्नाटकला विविध योजनांत तीन लाख कोटी रुपये दिले आहेत. त्यांचा हा दावा काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दिनेश गुंडू राव आणि कर्नाटकचे कृषिमंत्री कृष्ण बैरेगौडा यांनी फेटाळला आहे. ते म्हणाले की, सर्व राज्ये घटनात्मकदृष्ट्या निधीचे हक्कदार आहेत. कर्नाटकला केंद्राकडून १०,५३३ कोटी कमी मिळाले. राज्याचा त्यापेक्षा जास्त निधीवर हक्क होता.


राहुल गांधी हेच नरेंद्र मोदी यांना पर्याय : काँग्रेस  
काँग्रेसने या वर्षीच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन तयारी सुरू केली आहे. मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी नवी दिल्लीत एका मुलाखतीत सांगितले की, काँग्रेस विरोधकांच्या एकजुटीचे नेतृत्व करेल. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पर्याय असतील.

बातम्या आणखी आहेत...