आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी संघटनांत या वर्षी 117 काश्मिरी युवक सहभागी; सुरक्षा संस्थांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- या वर्षी दहशतवादी संघटनांत सहभागी होणाऱ्या काश्मिरी युवकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याबाबतची आकडेवारी २०१० पासून गोळा करण्यात येत होती, तेव्हापासून यंदा प्रथमच हा आकडा शंभरीपार गेला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.  


दहशतवादी संघटनांत सहभागी होणाऱ्या युवकांची संख्या २०१६ मध्ये ८८ होती. या वर्षीच्या नोव्हेंबरअखेर ही संख्या ११७ वर गेली आहे. दक्षिण काश्मीर हे दहशतवाद्यांचे मुख्य आश्रयस्थान झाले आहे. तेथूनच हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांना युवकांचा पुरवठा होतो, असे वृत्त सुरक्षा संस्थांनी दिले आहे.  


या वर्षी विविध दहशतवादी गटांत सहभागी झालेल्या युवकांमध्ये अनंतनागमधून १२, पुलवामा आणि अवंतीपोरातून ४५, शोपियांतून २४ आणि कुलगाममधून १० जणांचा समावेश आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडातून ४, बारामुल्ला आणि सोपोरमधून ६ तर बांदीपोरामधून ७ युवक या दहशतवादी गटांत सहभागी झाले आहेत. मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातून ५ तर बडगाममधून ४ युवक बेपत्ता झाले आहेत. काश्मीर खोऱ्यात विविध कारवायांत अटक झालेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीचे अहवाल तसेच गुप्तचर अहवालांच्या आधारे ही आकडेवारी देण्यात आली आहे. या वर्षी दहशतवादी गटांत सहभागी झालेल्यांची संख्या ११७ एवढी सांगण्यात आली आहे, पण राज्याचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी हा आकडा फेटाळला आहे.   


सुरक्षा संस्थांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असेल तरच पोलिस त्याची नोंद घेतात. पण बेपत्ता झालेल्या युवकांचे पालक भीतीमुळे माहितीच देत नाही, त्यामुळे प्रत्यक्षातील आकडेवारी जास्तच असते. 

बातम्या आणखी आहेत...