आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींपुढे आव्हाने: सपा-बसपची संभाव्य आघाडी, जाट आरक्षण, भाजप खासदारांवर नाराजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाधिक लोकसभा जागा, राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमधून ५२ ग्राउंड रिपोर्टची सुरुवात  लखनऊ  निवडणुकीच्या ठीक एक वर्ष आधी ‘दिव्य मराठी’ने उत्तर प्रदेशच्या ७५ पैकी ४० जिल्ह्यांच्या मतदारांचे मन जाणून घेतले. भाजप खासदारांवर लोकांची नाराजी ही पक्षासाठी समस्या ठरेल, हे त्यातून समोर आले. मात्र, बहुतांश लोक मोदींच्या कार्यशैलीमुळे खुश आहेत. 

 

 पश्चिम उ. प्रदेशमध्ये लागले ५ खासदारांच्या शोधाचे पोस्टर

रवी श्रीवास्तव - लोकसभा निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशात जाट आरक्षण हा सर्वात मोठा मुद्दा ठरू शकतो. बागपत, मेरठ, शामलीपासून ते मुरादाबाद, अमरोहापर्यंत जाट समुदाय आहे. अमरोहाचे चौधरी सुरेंद्र सिंह म्हणाले की, २०१४ मध्ये आम्हाला आश्वासन दिले होते, पण काही झाले नाही. सोबत बसलेले चौधरी पवन सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांचे म्हणणे कोणीच ऐकत नाही. निवडणूक आली की नेते येतात. सहारनपूरमध्ये सध्या भीम आर्मीचा मुद्दा चर्चेत आहे.

 

अलीकडेच भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षांच्या भावाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हत्या ठाकुरांनी केल्याचा भीम आर्मीचा आरोप आहे. भीम आर्मीच्या मुद्द्यावरून दलित मतदार भाजपबद्दल नाराज आहेत.येथे भाजप खासदारांबद्दलची नाराजी लोक उघडपणे बोलून दाखवतात. ५ लोकसभा जागांवर तर खासदारांच्या शोधाचे पोस्टरही लागले आहेत.

 

लखनऊपासून १७५ किमीवरील शाहजहांपूर येथे पोलिस कप्तान ऑफिसजवळ चहाचे लहान दुकान असलेले अजय म्हणाले की, मोदींकडे पाहून मी मत दिले होते, पण आता देणार नाही. मत द्यावे असे कोणतेही काम आमच्या खासदाराने केले नाही. संभल आणि अलिगड जिल्ह्यातही खासदारांबद्दल नाराजी दिसली. मथुरेच्या खासदार हेमा मालिनींबद्दलही लोक नाराज आहेत. 

 

> १८% जाट ५ ते ६ लोकसभा जागा प्रभावित करण्याची ताकद. अनेक जिल्ह्यांत लोकसंख्या ४०% पर्यंत आहे. 

 

अयोध्येत विकासाची गरज आणि रोजगार हा मोठा मुद्दा   

आदित्य तिवारी - फैजाबादच्या जनतेचे म्हणणे आहे की, योगी येथे विकासावर लक्ष देत आहेत. २०१९ च्या निवडणूक बिगुलाची सुरुवात अयोध्येपासून व्हावी, अशी अयोध्या-फैजाबादच्या जनतेची मागणी आहे. मात्र, त्यावर जास्त चर्चा करण्याची लोकांची इच्छा नाही. विकासावरच जास्त चर्चा झाली. 


अवध विद्यापीठाचे कुलगुरू मनोज दीक्षित म्हणाले की, अयोध्येत राहण्यासारखे एकही चांगले हॉटेल नाही. लोक येतात, संध्याकाळी फैजाबादला जातात. येथे व्यवस्था झाल्यास पर्यटक काही दिवस थांबतील. नरेंद्र देव कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. डी. के. द्विवेदी यांच्या मते, अवधची शेती सुपीक आहे, पाणीही आहे. पण येथे फळे-भाज्यांसाठी मोठा बाजार नाही. नानपाराचे येथील प्रसिद्ध डॉ. निशिथ साहू म्हणाले की, अयोध्या, बहराईच, गोंडा-बलरामपूरची गणना मागास भागातच होते. दुसरीकडे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या लखनऊ या गृहक्षेत्रात त्यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी यांची जादू जास्त दिसली. 


मात्र, येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे दौरे आधीपेक्षा जास्त होत आहेत, असे त्यांनी सांगितले. तर समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील  खासदार जावेद अली म्हणाले की, सपा-बसप आघाडी फक्त नेत्यांची आघाडी नाही, तर जनतेची आघाडी आहे. लोक त्या आघाडीचा स्वीकार करत आहेत.  

 

> २५% दलित, सर्वसाधारण : १६%, मागास जाती-३५%, मुस्लिम १८% आहेत. इतर ६% आहेत.

 

पूर्वांचलात योगी फॅक्टर, त्यांनी स्वत: लढावे ही इच्छा  

अमित मुखर्जी - मोदी पूर्वांचलच्या वाराणसीचे खासदार आहेत. मोदी आणि दूरसंचारमंत्री मनोज सिन्हांचा मतदारसंघ गाझीपूर सोडल्यास बहुतांश भागात नागरिकांची खासदारांवर नाराजी आहे. 


चंदौली मतदारसंघ भाजप प्रदेश अध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय यांचा आहे. लोकांचे म्हणणे आहे की, खासदार ४ वर्षांपासून जनतेला कधी भेटलेच नाहीत. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधील लोक त्यांंनी येथूनच खासदार व्हावे, असे म्हणतात. गोरखपूर रेल्वे स्थानकासमोर हॉटेल चालवणारे श्यामदास म्हणाले की, योगींव्यतिरिक्त कोणीही लोकसभा निवडणूक लढवली तरी तेथे भाजपचा पुन्हा पराभव होईल. विजय-पराजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निषाद जातीचे मतदारही योगी आदित्यनाथ यांना मतदान करू इच्छितात. 


गोल बाजारात दुकान चालवणारे नंदगोपाल म्हणाले की, योगी लढले नाहीत तर देवरिया, महाराजगंज, बस्ती, सिद्धार्थनगरसह ९ जागांवर भाजपचा विजय सोपा नसेल. सपा खासदार प्रवीण निषाद यांच्या मते,‘आम्ही पुन्हा निवडणूक जिंकू. ४ लाख निषाद मतदार आहेत. त्यांच्या आरक्षणासाठी आम्ही सतत लढत आहोत.’ पूर आणि इन्सेफेलाइटिस या येथील दोन मोठ्या समस्यांबद्दल जास्त चर्चा होत नाही. दरवर्षी २० ते ३० जिल्हे पुरात बुडतात. इन्सेफेलाइटिसमुळे एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.  

 

> २५% निषाद वर्गाचे मतदार, त्यांची पूर्वांचलातच नव्हे, तर यूपीच्या ३५ जागांवर महत्त्वाची भूमिका आहे.  

 

राजकीय पक्षांत आघाडीची चर्चा  

सपा प्रवक्ता आमदार सुनील साजन म्हणाले की, सपा-बसप आघाडी होईल. सपाचे माजी मंत्री राजकिशोर सिंह म्हणाले की, जागावाटपावरून कुठलेही वाद होणार नाहीत. बसपचे प्रदेश अध्यक्ष रामअचल राजभर म्हणाले की, आघाडीबाबतचा अंतिम निर्णय बहनजीच घेतील. भाजप प्रवक्ता शलभमणी त्रिपाठी म्हणाले की, लोकांना आघाडीचा स्वार्थ माहीत आहे. काँग्रेसचे प्रवक्ता सुरेंद्र राजपूत म्हणाले की, गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने जी कामे केली आहेत ती सर्व काँग्रेस सरकारच्या काळातील आहेत. मोदी सरकारमध्ये झीरो टॉलरन्सचे दावे फोल ठरले आहेत.  

 

बुंदेलखंड: रोजगार, पलायन व पाण्याचा मुद्दा 

बुंदेलखंडात झाशी, जालौन, हमीरपूर आणि बांदा या चार जागा आहेत. झाशी केंद्रीय विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुनील तिवारी म्हणाले की, येथे खाणकाम जोरात सुरू आहे. तरीही रोजगाराच्या संधी सतत कमी होत आहेत. स्थलांतराची समस्या वाढत आहे. मंत्री उमा भारती झाशीच्या खासदार आहेत. त्यांनी येथे पारंपरिक जलस्रोत वाचवू असे म्हटले होते, पण हे काम प्रत्यक्षात आले नाही. त्यांनी पहुज नदी दत्तक घेतली होती, पण तिची स्थिती ४ वर्षांनंतर खूपच दयनीय आहे.  

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...