आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानातील ५५ वर्षीय आमदार फुलसिंह मीना ४० वर्षांनंतर बारावी पास, आता बीएची परीक्षा देणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर- राजस्थानमधील उदयपूर ग्रामीणचे आमदार फुलसिंह मीना सातवी उत्तीर्ण होते. पण त्यांच्या पाच मुलींनी त्यांना केवळ शिक्षितच केले नाही तर महाविद्यालयापर्यंत पाठवले. सध्या ते बीए प्रथम वर्षाची परीक्षा देत आहेत. दौऱ्यावर असताना कारमध्ये शिकवण्यासाठी एक शिक्षकही त्यांना भेटला आहे. सरकारी शाळेतील मुख्याध्यापक नेहमी त्यांच्यासोबत राहून मीना यांना व गरीब मुलांना नि:शुल्क शिकवणी देतात. एक आमदार आपला िवद्यार्थी असल्याचे ते अभिमानाने सांगतात. 


५५ वर्षांचे फुलसिंह मीना यांनी ४० वर्षांनंतर हातात पुस्तक घेतले. चार वर्षांपूर्वीच त्यांनी दहावी, बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. सध्या ते बीए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाची तयारी करत आहेत. मंगळवारी त्यांचा एक पेपर झाला. निवडणुकीचे वर्ष असल्याने आमदारांना उद‌्घाटन आणि इतर कार्यक्रमांतून वेळ मिळत नव्हता. त्यामुळे कार्यक्रमस्थळी जातानाच ते कारमध्येच अभ्यास करतात. घरी असतील तेव्हा मुली त्यांना शिकवतात. 


शिक्षणासाठी त्यांचा उत्साह पाहता मनवाखेडा शाळेतील मुख्याध्यापक संजय लुणावतही कारमध्ये त्यांना शिकवणी देतात. बहुतांशी वेळा लुणावत अभ्यासक्रमाचे ऑडिआे रेकॉर्ड करून मीना यांना पाठवतात. कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण घेता आले नाही तरी आता त्यांच्या पाच मुली त्यांना शिकवत आहेत. त्यांच्या चार मुलींनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. एक मुलगी पुण्यात कायद्याचा अभ्यास करत आहे. कार्यक्रमांतून परतल्यानंतर घरी आल्यावर रात्री उशिरा मुली त्यांना विविध विषय शिकवतात. फुलसिंह मीना यांनी बीए प्रथम वर्षात लोकप्रशासन, राजशास्त्र, समाजशास्त्र, हिंदी हे विषय घेतले आहेत. 


शिक्षण नसल्याची खंत होती, मुलींनी दिले बळ
फुलसिंह मीना म्हणाले की, आमदार झाल्यानंतर विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपणही शिकले पाहिजे, असे वाटायचे. माझ्या मुलींनी शिकण्यासाठी मला प्रेरणा दिली. मला न विचारताच मुलीने दहावी परीक्षेचा फॉर्म भरला. मुलींमुळेच मी शिकू शकलो.

बातम्या आणखी आहेत...