आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी वाङ््मयाला इतिहास, पण परंपरा नाही : श्याम मनोहर यांचे परखड मनोगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराजा सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी, बडोदे - सभ्यता आणि संस्कृती यांचे नेमके अर्थ काय, याचा विचार आणि त्यांची उकल करणे ही समाजशास्त्रज्ञ आणि साहित्यिकांची  एक जबाबदारी आहे. नीट जगणे ही माणसाची एक प्रेरणा असते आणि त्याचे अमर्याद कुतूहल ही दुसरी प्रेरणा असते. नीट जगणे सभ्यतेत मोडते तर कुतूहल हा संस्कृतीचा प्रांत असतो. या पार्श्वभूमीवर जे कालातीत ठरेल, अभिजात ठरेल, असे काही मराठी साहित्यात आहे का, असा प्रश्न मला पडतो. विचार करता, मराठी साहित्याला इतिहास आहे, पण परंपरा नाही, असा कच्चा सिद्धांत मला मांडावासा वाटतो, असे परखड मनोगत वेगळ्या वाटेवरचे ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी मांडले आणि उपस्थितांना अंतर्मुख केले.  


साहित्य संमेलनाच्या  व्यासपीठावर मराठी साहित्यक्षेत्रात  अनवट वाटेवरचे उत्कृष्ट साहित्य निर्माण करून अमूल्य योगदान दिलेल्या  मनोहर यांचा विशेष सत्कार साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या  हस्ते करण्यात आला.  मनोहरांसह, प्रा. मिलिंद  जोशी  यांच्यासह  महामंडळाचे पदाधिकारी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. दुसरे सत्कारार्थी डॉ. गंगाधर पानतावणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे  उपस्थित राहू शकले नाहीत. सत्काराला उत्तर देताना मनोहर यांनी मांडलेले मुक्त चिंतन हाऊसफुल्ल प्रेक्षागृहाची दाद मिळवणारे ठरले.  


मनोहर म्हणाले,‘स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली, पण पूर्ण वेळ लेखन करत लेखकाला जगता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? शेतकरी आणि साहित्यिका आपापल्या कामातून जगतील अशी परिस्थिती का नाही? सर्वसामान्य लोक साहित्यातील किती उद्धृते वापरतात? साहित्य समाजात खोलवर पोचलेले नाही किंवा उल्लेख  करावा असे साहित्यात काही नाही, असे समजायचे का? जीवनाचा अर्थ काय, हे शोधण्याचे  स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आहे कारण स्वातंत्र्य हा लोकशाहीचा खरा गाभा आहे. ज्ञाननिर्माणाचे अनेक प्रकार असतात.  ज्ञान अनुकच प्रकारे निर्माण करावे, असा हेका वा हट्ट ठेवला तर ज्ञानाची पोपटपंची होते.

 

मनोहर यांनी सूक्ष्म लेखन केले : जोशी
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,‘श्याम मनोहर यांनी व्यक्ती आणि समाज यांच्या वर्तनाचे  सूक्ष्म तपशील तपासणारे लेखन केले आहे. व्यामिश्रतेतून समाजमनात निर्माण झालेला कोलाहल त्यांच्या  लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. आधुनिकता आणि आत्मभान यातील द्वंद्वाचे चित्रण ते करतात. मात्र शोकात्म जाणीव व्यक्त करणारे असूनही  ते भावुक, निराशावादी वा नियतीवादी नाही,”. श्रीपाद जोशी यांनीही मनोगत मांडले. 

बातम्या आणखी आहेत...