आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंगाकाठी शौचास बसणाऱ्यांवर कारवाई; कपडे धुण्यावरही बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी -  उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील गंगा घाटावर खुल्यावर शौचास बसणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच १५ मेपासून येथे व्यावसायिक लाभासाठी कपडे धुण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मंडल आयुक्त दीपक अग्रवाल यांनी येथील विकासकामांचा आढावा घेतला. वाराणसी नगर परिषदेला याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. नगर परिषदेचा स्वच्छता विभाग घाटाच्या स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे अग्रवाल म्हणाले. स्वच्छता  अभियानाला अधिक गतीने राबवण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले.  


अग्रवाल यांनी सांगितले की, व्यावसायिक लाभासाठी गंगा घाटाचा वापर कपडे धुण्यासाठी सर्रास होतो. १५ मेपासून यावर कडक निर्बंध लादण्यात येतील. यासंबंधी नागरिकांना आतापासूनच सूचना द्याव्यात. येथील सिंधिया घाटावर सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम ११ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.  

 

पंपिंग स्टेशनचे कामही वर्षभरापासून जैसे थे
येथील ५ पंपिंग स्टेशनच्या नूतनीकरणासाठी ४.५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र अद्याप काम रखडलेलेच आहे. १ वर्षापासून यात काहीच प्रगती झालेली नसल्याचा अहवाल दीपक अग्रवाल यांनी दिला आहे. या कामाचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आले होते. कंपनीच्या अधिकाऱ्याला हजर करण्याचे आदेश जल आयोगाला दिले आहेत. शाही नाल्याच्या सफाईसंबंधी कामही मंदगतीने सुरू असल्यामुळे २४ तास ३ शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

 

बातम्या आणखी आहेत...