आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभा निवडणुकीत अमेठी घराणेशाहीमुक्त करणार : शहा, काँग्रेसने माफी मागावी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायबरेली - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघाची घराणेशाहीच्या विळख्यातून मुक्तता करायची आहे. येथील लोकांच्या विकासाची जबाबदारी योगी सरकारची आहे, असे प्रतिपादन रायबरेलीच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले.  


देशातील अनेक मोठे नेते येथून निवडून गेले; पण या भागाचा विकास झालेला नाही. सत्य कोणापासून लपून राहत नाही. प्रत्येक मोठ्या कामात अडथळे येतात, पण यश जरूर मिळते. रायबरेली येथेही कमळ जरूर पुन्हा उगवेल, असे अमित शहा म्हणाले.  


ते म्हणाले, रायबरेलीची तर घराणेशाहीतून मुक्तता होईलच आणि भाजप रायबरेलीमध्ये विकासवाद आणेल. योगी सरकारकडून राज्याचा विकास केला जात आहे. आता रायबरेलीमध्ये “दिन दुना रात चौगुना विकास’ होईल.  रायबरेलीमध्ये मोठमोठे नेते फिरत होते, परंतु त्यांनी विकास केला नाही. आता भाजपला संधी आहे, तो या भागाचा विकास करणार. भाजप अध्यक्ष शहा म्हणाले, राहुल गांधी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर देशाची माफी मागितली पाहिजे. भाजप रायबरेलीला विकासाचे मॉडेल बनवेल. पाच वर्षांत उत्तर प्रदेशचा खूप विकास होईल. कर्नाटकात आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला हमखास यश मिळणार आहे. असा दावा त्यांनी केला.

 

भगव्या दहशतवादावर काँग्रेसने माफी मागावी

अमित शहा म्हणाले, काँग्रेसने भाजप व पंतप्रधानांची बदनामी चालवली आहे. देशात भगवा दहशतवाद असे संबोधणाऱ्या राहुल गांधी यांनी माफी मागावी. न्यायालयाने मक्का मशीद बॉम्बस्फाेट प्रकरणातील असीमानंदांसह सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता केली आहे. काँग्रेसने त्याला ‘हिंदू दहशतवाद’ असे म्हटले होते, त्यावर माफी मागणार का, याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यावे, असे आव्हान अमित शहा यांनी दिले.  

 

योगी म्हणाले, काँग्रेस फक्त घोषणा करत होती, आम्ही काम करू  
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, सरकारने अल्पवयीनांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची तरतूद केली आहे. अमेठी व रायबरेलीमध्ये विकास झालेला नाही. अमेठीत तर आजवर जिल्हाधिकारी भवन बांधण्यात आलेले नाही. काँग्रेस फक्त घोषणा करत होती. काम नाही. आम्ही रायबरेलीमध्ये एम्सची सुविधा आणत आहोत. प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय यांनी सोनिया गांधींवर टीका केली.

 

अमित शहा यांच्या सभेत आग लागल्याने धावपळ

उत्तर प्रदेशात रायबरेली येथे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहीर सभेत आग लागल्याने गोंधळ उडाला आणि धावपळ सुरू झाली. व्यासपीठावर अमित शहांसह अन्य वक्ते सुरक्षित हाेते. जाहीर सभेच्या मुख्य व्यासपीठाजवळ लोकांना बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. या वेळी प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांचे भाषण सुरू होते. आग लागल्याने सभेत एकच गोंधळ उडाला. सभेच्या ठिकाणी असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. यादरम्यान पोलिस व  भाजप कार्यकर्ते जाहीर सभेस आलेल्या लोकांना शांत बसवण्याचा प्रयत्न करत होते.  
आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पांडे यांचे थांबलेले भाषण पुन्हा सुरू झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व अमित शहा यांनी रायबरेली येथील जनतेसमोर काँग्रेसचे कर्तृत्व व आपल्या सरकारची कामगिरी मांडली. आग लागल्याने सभेत १५ मिनिटे व्यत्यय आला होता. तत्पूर्वी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य दिनेश प्रतापसिंह व त्यांचा भाऊ जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष अवधेशसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी आमदार राकेशसिंह यांची अनुपस्थिती लोकांना खटकली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...