आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलामाध्यमांतून साहित्यप्रेम वाढीस लागले; ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे मनाेगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराजा सयाजीराव गायकवाड संमेलननगरी (बडाेदा)- ‘नाटक, चित्रपट, मालिका.. अशा विविध कलामाध्यमांतून  वावरत असताना सुदैवाने अनेक उत्तमोत्तम  साहित्यकृतींवर आधारित व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. त्यातून  साहित्यप्रेम वाढीस लागले व मूळ साहित्यकृती वाचण्याची ओढही निर्माण झाली. साहित्यप्रेमात भाषांचे अडथळे जाणवले नाहीत,’ असे मनोगत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी रविवारी हजारो रसिकांच्या साक्षीने मांडले.    


साहित्य संमेलनातले  ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ हे सत्र सहभागींच्या टिप्पणी आणि विचारांनी उत्तरोत्तर रंगत गेले. उत्तरा मोने आणि राजेंद्र हुंजे यांनी रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोळकर आणि अॅड. उज्ज्वल निकम या प्रतिभावंतांशी संवाद साधला. या गप्पांसाठी सभागृह खचाखच भरले होते.  रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, ‘मराठी शाळेत शिकले की आपल्याला  इंग्रजी भाषेत संभाषण करता येत नाही, असा न्यूनगंड उगाच वाटू लागतो. अर्थातच सुुरुवातीला मलाही तो होता. पण ‘गांधी’ चित्रपट करताना संभाषणकलेचा आत्मविश्वास आला की जग जिंकता येते हे मला जाणवले. त्यासाठी इंग्रजी शाळेत जाण्याची गरज नसते. नाटक, चित्रपट अशा माध्यमात  वावरताना भाषेवरील, साहित्यावरील प्रेम अधिकच दृढ होत गेले. मी मराठी, हिंदी, इंग्रजीसह गुजराती, मल्याळम , कन्नड अशा अनेक भाषांमध्ये काम केले. प्रत्येक भाषेची आपापली समृद्धी असते. त्यातूनच  संबंधित  समाजाचे चित्रण करता येते आणि कलावंत व माणूस म्हणूनही आपण समृद्ध होत जातो.’   ‘अाज लोककलांना  विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मनोरंजनाच्या माध्यमांचा भडिमार होत असताना लोककला  लोप पावत आहेत. त्या का लोप पावत आहेत हा अभ्यासाचा विषय आहे.’ हे मुद्देही हट्टंगडी यांनी मांडले.    


दाभोळकर म्हणाले, ‘जाहिरात क्षेत्रात वावरताना, मराठी बोलताना मला कधीही कमीपणा वाटला नाही. ‘पुरुष’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नाटके मी इंग्रजीत अनुवादित केली. त्या वेळी मराठीच्या  तोडीचे कलाकार इंग्रजीत नाहीत हे लक्षात आले. जाहिरातीतील ब्रँड व्यक्ती नव्हे तर लोक तयार करतात. या क्षेत्रात सर्जनशीलतेची पातळी घसरत चालली आहे. भाषा टिकवण्याचे काम एका व्यक्तीचे नाही, तर समुदायाचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.    

 

न्यूनगंड हा माणसाचा माेठा शत्रू : अॅड. निकम  
अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘सद््गुणांचा अभाव, दुर्गुणांचे प्राबल्य म्हणजे विकृती. मराठी भाषा लवचिक आणि श्रेष्ठ आहे. मात्र मातृभाषेत  शिक्षण घेत असतानाच इतर भाषाही आत्मसात करायला हव्यात. न्यूनगंड हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. मातृभाषेच्या वाचनातून आत्मविश्वास येतो, आपले म्हणणे ठामपणे मांडता येते. मी लहानपणी ऐतिहासिक कादंबऱ्या  वाचायचो. त्यातूनच धाडस, निर्भयता अंगी रुजली.’   

 

बातम्या आणखी आहेत...