आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानमध्ये भाजपसमोर राजपूत, ब्राह्मण, दलितांची नाराजी दूर करण्याचे आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेची जादू चालली. भाजपने २०० पैकी १६३ जागा जिंकून विक्रम केला. काँग्रेसला फक्त २१ जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यसभेच्या सर्व १० जागांवर भाजपने कब्जा केला. प्रथमच राजस्थानमधून काँग्रेसचा एकही सदस्य नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत इतिहासात प्रथमच भाजपने सर्व २५ जागा जिंकल्या. काँग्रेसला विधानसभा पोटनिवडणुकीत दिलासा मिळाला. पक्षाने ४ पैकी ३ जागा जिंकल्या. पक्षाने लोकसभा पोटनिवडणुकीत दोन जागा जिंकल्या.  

 

जयपूर- गेल्या शनिवारी पेरूच्या बागेत राज्यभरातून आलेल्या तीन लाख लोकांची गर्दी पाहून भाजपच्या नेत्यांच्या डोळ्यांत चमक आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पुन्हा बळ मिळेल, अशी अपेक्षा नाराज कार्यकर्ते करत आहेत. राज्यात सत्ताविरोधी लाटेचा सामना करत असलेल्या भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा दिलासा देणारी ठरली. 


दुसरीकडे, राज्यात पुढील सरकार आपलेच असेल, असे काँग्रेसला वाटत आहे. मात्र, गेल्या वेळी लोकसभेच्या सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते, या वेळी भाजपला १८ ते २० जागा मिळू शकतील. पण राज्य सरकार विधानसभा निवडणुकीत हरले तर १० लोकसभा जागांचे नुकसान होऊ शकते. भाजपचे नुकसान झाले तर त्याचे एक कारण राजपूत, ब्राह्मण, दलित विशेषत: मेघवालांची नाराजी हे असेल. राजपूत समाजाने आघाडी उघडली आहे. पक्षाला त्यावर उपाय योजावा लागेल. अजमेर व अलवर लोकसभा तसेच मांडलगड विधानसभा मतदारसंघातील पराजयाचे तेही एक कारण मानले जात आहे.  


दुसरीकडे, काँग्रेस आणि भाजप दोघेही जोडतोडीत व्यग्र आहेत. भाजपने आपले नाराज नेते डॉ. किरोडीलाल मीणा यांना पक्षात पुन्हा घेतले आहे. मीणा यांच्यासह राजपाचे तीन आमदार भाजपत आले आहेत. पण पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार घनश्याम तिवारी यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्याने भाजपचे नुकसान निश्चित आहे. काँग्रेसने नागौरचे दोनदा जिल्हाप्रमुख राहिलेले डॉ. सहदेव चौधरींना पक्षात घेतले आहे. भाजपचे माजी मंत्री डॉ. हरिसिंह आणि माजी केंद्रीय मंत्री सुभाष महरिया यांनाही पक्षात घेतले आहे. आमदार सोनादेवीही काँग्रेसमध्ये आल्या आहेत. 


भाजपला लोकसभेच्या जागांत नुकसान दिसत असले तरी मतदार मोदींवर नव्हे, राज्य सरकारवर नाराज आहेत. गंगानगरचे ए. पी. सिंह म्हणाले की, आमच्या जवळ पाकिस्तानची सीमा आहे. मात्र, मोदी असल्याने कोणी काहीही करू शकणार नाही, याचा विश्वास आहे. जयपूरचे सज्जनकुमार म्हणाले की, मोदींना पर्यायच नाही.  


भाजपची चिंता :  १० जागांवर मोठे आव्हान  
लोकसभेच्या गंगानगर, बिकानेर, भरतपूर आणि करौली-धौलपूर या एससीसाठी राखीव चार जागा आणि बांसवाडा, दौसा व उदयपूर या एसटीसाठी राखीव जागा भाजपने मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. पण अॅट्रॉसिटी कायद्यावरील सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि २ एप्रिलच्या भारत बंददरम्यान झालेल्या घटनांमुळे दलित भाजपवर नाराज आहेत. 


आव्हानात्मक जागा : २००९ मध्ये फक्त बिकानेर, चुरू, झालावाड आणि जालोर या जागा मिळाल्या होत्या. दौसा अपक्षाकडे गेली आणि २० जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. २०१४ च्या लाटेत भाजपने सर्व जागा जिंकल्या. २०१९ मध्ये गंगानगर, बाडमेर, करौली-धौलपूर, भरतपूर, बांसवाडा, अलवर, अजमेर, सीकर, झुंझुनू, टोंक-सवाई माधोपूरमध्ये मोठे आव्हान मिळणार आहे. अजमेर व अलवर या जागांवर भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. 


प्लस पॉइंट : माळी अध्यक्ष करून काँग्रेसला आव्हान 
राज्यसभा खासदार मदनलाल सैनी यांना अध्यक्ष करून त्याद्वारे भाजपने माळी मतांवर नजर ठेवली आहे, जी माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यामुळे काँग्रेसकडे झुकली होती. गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया यांच्या मते, मोदी-जनसंवाद कार्यक्रमामुळे पक्षात उत्साह आहे. त्याचा फायदा आगामी निवडणुकीत निश्चित मिळेल. आमचा पक्ष लोकसभेत पूर्वीप्रमाणेच कामगिरी करेल.  

 

काँग्रेसची चिंता : गटबाजी, हाणामारी 
काँग्रेसचे नेतृत्व सचिन पायलट यांच्याकडे आहे, पण गहलोत आणि पायलट यांच्यातील रस्सीखेच जगजाहीर आहे. काँग्रेसने बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी ‘माझा बूथ-माझा गौरव’ ही मोहीम चालवली आहे. पण त्यात तिकिटाच्या दावेदारीच्या नावावर स्थानिक नेते शक्तिप्रदर्शन करत आहेत. हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी अविनाश पांडेंच्या उपस्थितीत जयपूरच्या शाहपुरात राष्ट्रीय प्रवक्ता संदीप चौधरींचे कपडे फाडण्यात आले. सवाई माधोपूरमध्ये आयटी सेलचे प्रमुख दानिश अबरार यांनाही धक्काबुक्की झाली. जयपूरच्या किशनपोलमध्ये माजी महापौर ज्योती खंडेलवाल यांनी स्थानिक उमेदवाराचा मुद्दा मांडला. अनेक ठिकाणी वादाची स्थिती आहे.  


प्लस पॉइंट : मतांच्या टक्केवारीत वाढ  
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ४६%, तर काँग्रेसला ३४% मते मिळाली होती. त्यानंतर लोकसभेत भाजपची मतांची टक्केवारी १० टक्के वाढून ५६ झाली आणि काँग्रेसची मत टक्केवारी ३१ वर आली. पण त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला ४७ % मते मिळाली, तर काँग्रेसला ४५%. म्हणजे मतांचा फरक दोन टक्के एवढाच राहिला.  

बातम्या आणखी आहेत...