आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकारितेतील जोश, उत्कटता आणि जिद्द होते कल्पेशजी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- 'दैनिक भास्कर'चे समूह संपादक कल्पेश याज्ञिक यांचे गुरुवारी रात्री उशिरा निधन झाले. शुक्रवारी इंदुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्पेशजी सुमारे ३० वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय होते. यापैकी २१ वर्षे ते दैनिक भास्करमध्येच होते. ते प्रखर वक्ते होते. देश-विदेशातील संवेदनशील मुद्द्यांवर ते निर्भीड आणि निष्पक्षपणे लिखाण करत. दर शनिवारी दैनिक भास्करमध्ये प्रकाशित होणारा 'असंभव के विरुद्ध' हा कॉलम अत्यंत चर्चेत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'देश आणि समाजाच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर कल्पेशजींची लेखणी आगळा दृष्टिकोन देत होती.' त्यांच्या पश्चात आई प्रतिभा याज्ञिक, पत्नी भारती, मुली शेरना आणि शौर्या, भाऊ नीरज आणि अनुराग असा परिवार आहे. 


खरे तर कल्पेशजी पत्रकारितेतील जोश, उत्कटता आणि जिद्दीचे दुसरे नाव होते. चोवीस तास फक्त बातमी, बातमी आणि बातमीच. बातमीचा अर्थ काळ्या शाईची काही अक्षरे, शब्द किंवा ओळी इतकाच नाही. सत्याचा शोध … अन् त्या शोधातून जे काही, आणि जसे काही पेरले आणि उगवले... ती होती त्यांची पत्रकारिता. 


तासन््तास काम केल्यानंतरही तोच जोश. ब्रह्मरंध्रातून पाताळलोकापर्यंत खड््गाप्रमाणे चिरत जाणारा आवाज. न्यूजरूममध्ये कधीही न संपणारे किस्से आणि अनेक वर्षांपासून वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींच्या माळा गुंफणे ही त्यांची दैनंदिन जीवनशैली होती. घर, कार्यालय किंवा बाजार वा कुठल्याही सोहळ्यात, जेथे कुठे भेटायचे तेथे बातम्यांशिवाय दुसरी बातच नसायची. पण, या 'शिवाय'मध्येही केवळ बातम्याच असायच्या. कधी न्यूयॉर्क टाइम्स, कधी लंडन टाइम्स ...अन् असायचे त्यांच्या मोठमोठ्या संपादकांचे यादगार किस्से. त्यांचे बोलणे ऐकत राहावे असेच वाटायचे. कधी रात्रीच्या तीन वाजेपर्यंत, तर कधी पहाटे पाचपर्यंत. किश्श्यांनी पोट भरायचे, मन नव्हे. हा सिलसिला कुण्या एके दिवशी, आठवडा वा महिन्यात नव्हे तर संपूर्ण ३६५ दिवस चालायचा. ते जितके ऑनलाइन अपडेट असायचे तितकेच पौराणिक ग्रंथांच्या अध्ययनातही गढून जायचे. जे काही वाचायचे ते सहकाऱ्यांना सांगायचे, अर्थही उलगडून दाखवायचे. 


जसे महापुरात नदीचे पाणी वेगाने वाहते, मात्र सगळा कचरा किनाऱ्यावरच सोडते, तसेच त्यांचे संपादन होते. बातमी असेल तर त्यात तथ्येच असतील. उरलेला मजकूर वार्ताहराचे आपले विचार असतात. ते सर्व काटून-छाटून एकाच जागी टाकायचे. म्हणायचे - बातम्यांत विचारांना कोणतेही स्थान नसते. त्यासाठी वेगळी जागा आहे. तेथे लिहा. वाचकांना बातमी ती तिच्या पूर्ण अस्सल रूपातच मिळायला हवी. बातमीत जितक्या लोकांचे नाव किंवा उल्लेख येतील, त्या सर्वांशी बोला, समजून घ्या, मगच लिहा. जेव्हा कोणताही वार्ताहर म्हणतो की बातमीशी संबंधित व्यक्तीच भेटली नाही तेव्हा त्यांचे एकच उत्तर असायचे - भेटणार नाहीच, पण तो शोधावाच लागेल. त्याचे म्हणणे घेणे ही आपली गरज आहे, संबंधित व्यक्तीची नाही. 


कल्पेशजींनी कधीच वेळेची पर्वा केली नाही. बातमीत प्रचंड गढून जायचे. त्यांच्या मनात एक जिद्दीचा वारू दौडत असायचा. ना कधी थांबायचे ना कधी थकायचे. अविरत... ज्या काळाला त्यांनी कधीच जुमानले नाही तोच काळ आज अकालीच त्यांच्यापर्यंत पोहोचला अन् आमच्यापासून त्यांना हिरावून नेले. काळाच्या अनंताकडे... 

 

बातम्या आणखी आहेत...