आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात उंच रणक्षेत्र सीयाचीन: श्वास रोखला जाऊ नये म्हणून झोपलेल्या सैनिकांना दर तासाला करतात जागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
३० हजार फुटांच्या उंचीवर बर्फाची दरी ओलांडताना सैनिक. हे छायाचित्र आम्हाला विशेषत्वाने लष्कराच्या एडीजी-पीआयने उपलब्ध करून दिले आहे. - Divya Marathi
३० हजार फुटांच्या उंचीवर बर्फाची दरी ओलांडताना सैनिक. हे छायाचित्र आम्हाला विशेषत्वाने लष्कराच्या एडीजी-पीआयने उपलब्ध करून दिले आहे.

जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत बर्फच बर्फ. १०० किमी वेगाने येणारे बर्फाचे वादळ. २१ हजार फूट उंचीवरील या जगातील सर्वात उंच रणक्षेत्रावर प्रत्येक पावलावर मृत्यूचा धोका आहे. पूर्वेला चीनची तर पश्चिमेला पाकिस्तानची सीमा. दररोजचे हिमस्खलन, मेटल बाइट, अत्यंत उंच भागात होणाऱ्या आजारांसह श्वास मंदावणाऱ्या आणि हाडे गोठवणाऱ्या बर्फवृष्टीत ‘दिव्य मराठी’चा प्रतिनिधी येथे पोहोचला. तेथे २४ तास व्यतीत केले आणि सैनिक कसे राहतात याची माहिती घेतली. 

 

आम्ही तेथे पोहोचताच जाणीव झाली की, येथे दोन शत्रू आहेत. एक शेजारी देश आणि दुसरा हवामान. एका जवानाने सांगितले की, अलीकडेच येथे हिमवादळ आले होते. सैनिक हिमस्खलनात अडकले होते. बर्फात अडकलेल्या सैनिकांना जिवंत काढण्यासाठी बचाव दलातील कुत्रे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. एका कुत्र्याने मला शोधले. वेळीच रुग्णालयात नेल्याने मी वाचलो. डॉग हँडलर देवीसिंह यांनी सांगितले की, बेस कॅम्पमध्ये बचाव पथकातील कुत्र्यांचे पथक तैनात आहे. त्यात चार-पाच कुत्रे आहेत. जेव्हा हिमस्खलनात एखादा सैनिक बर्फाखाली अडकतो, तेव्हा त्वरित कॉल आल्यानंतर हेलिकॉप्टरमधून कुत्र्यांना दोरीने खाली उतरवले जाते. जेथे सैनिक अडकलेला असतो तेथे तो कुत्रा पंजा मारतो. त्यामुळे कारवाई सोपी होते आणि सैनिक वाचतो. नूब्रा खोऱ्यातून पुढे सर्वात उंच रणक्षेत्र सियाचीनला जंगली गुलाबी खोरेही म्हटले जाते, पण येथे बर्फाच्छादित पहाडांशिवाय कोणत्याही काटेरी झुडपाचेही नामोनिशाण नाही.  

 

साडेतीन दशकांपूर्वी पाकिस्तानच्या घुसखोरीचे उत्तर देण्यासाठी सुरू केलेल्या ऑपरेशन मेघदूतनंतर ७०-७५ किमी पसरलेला हा निर्जन भाग युद्धमैदानात रूपांतरित झाला आहे. भारताच्या या दोन्ही शत्रू देशांचे (पाकिस्तान आणि चीन) महत्त्वपूर्ण सी पॅक म्हणजे व्यापारविषयक रस्ता येथूनच जातो. तो आपल्यासाठी दुहेरी आव्हान आणि धोकाही आहे. अशा स्थितीत भारतीय लष्कराचे सैनिक अशा वादळी हवामानात या दोन्ही देशांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. तीन ते चार महिन्यांपर्यंत सियाचीनमध्ये तैनातीदरम्यान जवान अंघोळ करत नाहीत. ते फक्त टॉवेल परेड घेतात. म्हणजे आपले शरीर स्वच्छ करतात. त्यानंतर जवान पूर्ण दिवस निगराणीत राहतात, आजार होऊ नये हा हेतू. कपडे केव्हा बदलायचे आणि टॉवेल परेड केव्हा करायची याचे दिशानिर्देश सैनिकांना दिले जातात. जसपाल सिंह यांनी सांगितले की, थंडीपासून बचाव करण्यासाठी दररोज ‘हँड-फूट परेड’ होते. म्हणजे कोल्ड इंज्युरीपासून वाचण्यासाठी गरम पाण्यात पाय ठेवतात. येथे केरोसीनच लाइफ लाइन आहे. त्याच्या चिमणीनेच पाणीही गरम होते आणि तंबूही गरम राहतो.  

 

सियाचीनच्या रणक्षेत्रात चौक्यांवर तैनातीआधी भारतीय लष्कराच्या सैनिकांना तीन आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. १२ हजार फुटांच्या उंचीवरील सियाचीन बॅटल स्कूलमध्ये (एसबीएस) प्रशिक्षण पार पडल्यानंतरच सैनिकाला उंचावर पाठवले जाते. त्यासाठी एक आठवड्यापर्यंत अॅक्लेमेटायझेशन शिकवले जाते. कमी ऑक्सिजन, हवेचा कमी दाब, उणे तापमान, रक्तदाब कमी होणे, झोप न येणे, स्मृती जाणे, मेटल बाइट म्हणजे उणे तापमानात लोखंडाच्या थंड वस्तूला हात लावताच बोटांनी काम करता न येणे अशा धोक्यांपासून कसा बचाव करायचा ते शिकवले जाते. प्रशिक्षण घेतलेल्या आशिष वर्मा आणि लाल मोहंमद यांनी सांगितले की, उणे चाळीस अंश तापमानात शस्त्रास्त्रांची देखभाल करणे, ती चालवणे, बर्फाच्या उभ्या भिंतीवर चढणे, रोप अप होऊन चालणे, तंबूत बर्फाच्या चादरीवर स्लीपिंग बेडमध्ये झोपणे, हिमस्खलनापासून वाचण्याच्या पद्धती शिकवल्या जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सीमेवरील चौकीवर पाठवले जाते.  

 

उंचीवर तैनाती झाल्यानंतर अलीकडेच बेस कॅम्पला परतलेले डोगरा रेजिमेंटचे सुभेदार पुरुषोत्तम कुमार यांनी सांगितले की, येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या युनिटचे सीओ आम्हाला सीमेवरील चौकीवर रवाना करतात. तेथून जाण्याआधी सर्व सैनिक ओपी बाबांचे दर्शन घेतात. तेथे पायी रवाना झाल्यानंतर चौकीपर्यंत पोहोचण्यासाठी दहा दिवस लागतात. चौकीवर जाताच पूर्ण दिनचर्या बदलते. सकाळी साडेचार वाजता सूर्योदय होताच सर्वात आधी तंबूत राहणाऱ्या सहा-सात सैनिकांसाठी पाण्याची तयारी करावी लागते. त्यासाठी ३० ते ३५ किलो बर्फ आणून त्याला गरम करतात, तेव्हा १७ ते १८ लिटर पाणी तयार होते. या पाण्यात औषधी गोळ्या टाकून ते किटाणूरहित बनवतात. दिवसभर हेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्याचबरोबर सैनिक तंबू आणि शस्त्रास्त्रांची देखभाल करतात. नंतर ते गस्तीसाठी निघतात.  


दर २-३ दिवसांनी एक सैनिक गंभीर आजारी  
येथे आर्मी मेडिकल कोअरचे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ देवदूतापेक्षा कमी नाही. बेस कॅम्पमध्ये अॅडव्हान्स ड्रेसिंग स्टेशनचे सीओ कॅप्टन डॉ. श्रीकांत यांनी सांगितले की, दर दोन-तीन चौक्यांमध्ये डॉक्टरचे पथक आहे. तेथे सैनिकांना झोप न येणे, श्वास घेण्यात त्रास, स्मृतिभ्रंश, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे असे अनेक आजार होतात. दररोज ३०० ते ४०० जवानांची वैद्यकीय तपासणी होते. १५ ते २० जण आजारी पडतात. दर दोन ते तीन दिवसांनी वरच्या भागातून गंभीर आजारी असलेले सैनिक येतात.  


भूक लागत नाही, पण पोट भरलेले असणे आवश्यक  
जवान रोप अप म्हणजे एका दोराला दुसरा दोर बांधून चालतात. कोणी बर्फाखाली गेल्यास त्वरित बाहेर काढता यावे हा हेतू. शीख रेजिमेंटचे गुरुचरण सांगतात की, हातात दोन हातमोजे घालावे लागतात. येथे भूक लागत नाही, तरीही सैनिकांचे नेहमी पोट भरलेले असणे आवश्यक आहे. रात्री तंबूत झोपताना दर तासाला हवालदार सर्व सैनिकांना जागे करतो. कमी ऑक्सिजनमुळे कोणाचा मृत्यू होऊ नये हा त्यामागील हेतू आहे. डबाबंद जेवण आणि द्रव पदार्थच येथील मुख्य जेवण आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...