आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसच्या प्रत्येक शेअरधारकांना मिळणार एकास एक बोनस शेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसच्या संचालक मंडळाने शेअरधारकांना प्रतिशेअर एक-एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन डिपॉझिटरी शेअर वरही याच प्रमाणात बोनस देण्यात येणार आहे. कंपनीने शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर करतानाच बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. हे शेअर दोन महिन्याच्या आत म्हणजेच १२ सप्टेंबरपर्यंत वाटप केले जाणार आहेत. कंपनीच्या नगदी महसुलात मोठी वाढ झाल्यामुळे हा पैसा शेअरधारकांमध्ये वाटण्याचा कंपनीवर दबाव होता. एप्रिल महिन्यातच कंपनीने शेअरधारकांना १३,००० कोटी रुपये परत देणार असल्याचे सांगितले होते. यात २,६०० कोटी रुपयांच्या विशेष लाभांशाचाही समावेश आहे. 


एप्रिल ते जून तिमाहीमध्ये कंपनीला ३,६१२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत यात ३.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. या दरम्यान महसूल १७,०७८ कोटी रुपयांवरून १२ टक्के वाढून १९,१२८ कोटी रुपये झाला. शुक्रवारी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर कंपनीने निकाल जाहीर केला होता. कंपनीने २०१८-१९ मध्ये ६ ते ८ टक्के महसुली वाढीचा अंदाज कायम ठेवला आहे. निव्वळ नफ्याचा २२ ते २४ टक्क्यांचा अंदाज आहे. 


कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सलिल पारेख यांनी सांगितले की, मार्जिन जास्त झाल्याने कंपनी डेटा अॅनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या डिजिटल सेवांवरील गुंतवणुकीत वाढ करणार आहे. कंपनीला सर्वाधिक व्यापार बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रातून मिळतो. मात्र, महसुलात या क्षेत्राची भागीदारी वार्षिक आधारावर ३३ टक्क्यांनी कमी हाेऊन ३१.८ टक्क्यांवर आली आहे. महसुलात दूरसंचार, युटिलिटी आणि निर्मिती क्षेत्रातील भागीदारी वाढली आहे. 


आतापर्यंत देशातील दोन सर्वात मोठ्या आयटी कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिसचे निकाल घोषित झाले आहेत. आयडीबीआय कॅपिटलचे संशोधक उर्मिल शहा यांच्या मते दोन्ही निकालांवरून आयटी उद्योगात तेजी असल्याचे सिद्ध होत नाही. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचे शेअर १.१२ टक्क्यांनी वाढून १,३०९.१० या पातळीवर बंद झाले. कंपनीने शेअर बाजार बंद झाल्यानंतर निकाल जाहीर केले. 


पनायाच्या मूल्यात २७० कोटींची घट 
मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करताना पनायाची विक्री करणार असल्याचे इन्फोसिसने म्हटले होते. मात्र, आतापर्यंत त्याची विक्री हाेऊ शकलेली नाही. या दरम्यान याच्या मूल्यात २७० कोटी रुपयांची घट झाली आहे. कंपनीचे माजी सीईओ विशाल सिक्का यांनी त्यांच्या कार्यकाळात इस्रायली कंपनी पनायाचे अधिग्रहण केले होते. या करारानंतर सिक्का वादात अडकले होते. अखेर २०१७ मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 

बातम्या आणखी आहेत...