आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43 वर्षांपासून सुफी गाणारी वडाली जोडी फुटली, बंधूंची साथ सोडून प्यारेलाल यांनी घेतला जगाचा निरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- पंजाबमध्ये सुफी गाण्यांना साज चढवणाऱ्या ‘वडाली ब्रदर्स’पैकी प्यारेलाल वडाली यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. या जोडीतील उस्ताद पुरनचंद वडाली यांचे ते कनिष्ठ बंधू होते. अमृतसरमधील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात हलवण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. अमृतसरजवळ असलेल्या गुरु की वडाली गावचे रहिवासी वडाली बंधू सुफी गायकीमुळे प्रसिद्ध होते. वडील बंधू पुरनचंद यांच्याकडेच प्यारेलाल यांनी गायनाचे धडे घेतले. १९७५ मध्ये दोघांनी जालंधरमधील हरबल्ला मंदिरात एकत्र गाण्यास प्रारंभ केला. गझल, भजन, लोकगीत अाणि सुफी गायन ते करीत. तू माने या न माने दिलदारा..., हीर और याद पिया की आए... यांसारख्या गाण्यांनी वडाली बंधूंना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या जोडीने अनेक भजने तसेच बॉलीवूडमध्ये पार्श्वगायन केले. प्यारेलाल यांचे ज्येष्ठ बंधू पुरनचंद २५ वर्षे आखाड्यात पहिलवान म्हणून कारकीर्द गाजवत होते. तर, प्यारेलाल गावात रासलीलेत कृष्णाची भूमिका करून कुटुंबाला आर्थिक मदत करत. पित्याच्या सांगण्यावरून पुरनचंद यांनी गायन सुरू केले. पं. दुर्गादास व बडे गुलाम अली खां हे त्यांचे गुरू होते. 

 

पद्मश्री मिळाली तेव्हा विश्वासच बसला नव्हता
२००५ मध्ये सरकारने पुरनचंद यांना पद्मश्रीने सन्मानित केले. ते पत्र आले तेव्हा वाचता येत नव्हते म्हणून तसेच पडले. मुलाने सांगितल्यावर त्यांना पद्मश्रीबद्दल कळले. त्यांना यावर विश्वासही बसला नव्हता.

 

बॉलीवूडमध्ये गायचे नव्हते पण...
वडाली ब्रदर्सना फक्त सुफी गाणी व गझलच गावयाच्या होत्या. बॉलीवूडसाठी गायचे नाही, असे त्यांनी ठरवले होते. मात्र, २००३ मध्ये गुलजार यांच्या पिंजरमधून त्यांनी गाण्यास सुरुवात केली. यात त्यांनी एक गीत गायिले. चेहरा मेरे यार का (धूप, २००३), रंगरेज मेरे (तनु वेड्स मनु, २०११), तू ही तू ही (मौसम, २०११) सारखी हिट गाणी त्यांनी नंतरच्या काळात गायिली.

बातम्या आणखी आहेत...