आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाण केलेल्या विमानामध्ये बॉम्बची खोटी माहिती देणाऱ्यास प्रथमच आजन्म कारावासाचे लावले कलम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहित - Divya Marathi
मोहित

जयपूर- येथील विमानतळावर मंगळवारी खळबळजनक घटना घडली. मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाने विमान सुटल्यामुळे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती देऊन शेकडो लोकांचे प्राण धोक्यात आणले होते. तथापि, सीआयएसएफ व विमानतळ प्रशासनाने आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 


इंडिगो विमानतळाचे सहायक व्यवस्थापक (सुरक्षा) विश्रुतकुमार सेवदा यांनी सांगानेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ५०५, ५०७, १८२ आणि सिव्हिल एव्हिएशन अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिल्याने प्रथमच एखाद्याच्या विरोधात आजन्म कारावासाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव मोहित टाक (२४, रा. निवारू रोड) असे आहे. आपले विमान सुटले होते. यासाठी विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली, अशी कबुली त्याने दिली आहे. मोहितविरोधात एका मुलीचा विनयभंग केल्याचा खटला सुरू आहे. त्यासाठी त्याला मुंबईला इंडिगोच्या विमानाने मंगळवारी पहाटे ५ वाजता जायचे होते. परंतु तो विमानतळावर पोहोचेपर्यंत  विमान सुटले होते.  


विमान थांबवण्यासाठी मोहितने इंडिगोच्या कॉल सेंटरवर ५.२४ वाजता दोन वेळा वेगवेगळ्या क्रमांकांवरून विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. या कॉलचे लोकेशन काढण्यात आले असता, ज्या व्यक्तीने फोन केला ती सांगानेर विमानतळाच्या बाहेर उभी असल्याचे लोकेशन दिसले.  


असे पकडले आरोपी मोहितला 
बॉम्बची माहिती मिळताच खळबळ उडाली. शोध घेताना ५ प्रवाशांचे विमान चुकल्याचे समजले. पाचही लाेकांना सीआयएसएफ आणि एअरलाइन कंपनीने फोन केेले. मोहित नावाच्या प्रवाशाचा आवाज बॉम्बची धमकी देणाऱ्या कॉलच्या आवाजाशी जुळला. दुसऱ्या विमानाने मुंबईला फुकटात पाठवून देतो, असे सांगून विमानतळावर बोलावले. तो आल्यानंतर त्याची चौकशी झाली आणि त्याने चूक कबूल केली. कॉल डिटेल्समधून फोन त्यानेच केल्याचे सिद्ध झाले.


मोहित कोरिओग्राफर; विनयभंगाच्या खटल्यात मुंबईला जात होता   आरोपी मोहित याआधी जयपूर येथे जवाहरनगर टीला क्रमांक-१ वर राहत होता. आता निवारू रोडवर राहतो. मुंबईत तो मॉडेलिंग व कोरिओग्राफी करतो. एका तरुणीचा विनयभंग केल्यावरून त्याला खटल्यासाठी मुंबईला जायचे होते. मोहित डान्स इंडिया डान्ससह इतर अनेक कार्यक्रमांत सहभागी होता.


सीआयएसएफपर्यंत माहिती मिळण्यास ४० मिनिटे लागली  
पहाटे ५.०५ वाजता विमान  जयपूरहून मुंबईला जाणार होते. विमानात १४५ प्रवासी होते. ५ प्रवाशांचे विमान चुकले होते. पहाटे ५.२१ वाजता इंडिगो कॉल सेंटरला बॉम्बची माहिती मिळाली. परंतु सकाळी ६.०१ वाजता ती जयपूरला देण्यात आली. तोपर्यंत विमानाने उड्डाण केेलेले होते. वाटेत वैमानिकास सूचना देण्यात आली. सकाळी ६.१६ वाजता मुंबई विमानतळावर विमानाची तपासणी झाली.  
- आरोपी मोहित टाकवर खटला चालेल. त्याच्यावर आजीवन विमान प्रवास करण्यास बंदी लावली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...