आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्रचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी पुन्हा काँग्रेसमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. रेड्डी यांनी गुरुवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व पुन्हा पक्षप्रवेश केला. 


काँग्रेसचे प्रसार माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दलची माहिती दिली. रेड्डी यांच्यासमवेत त्यांच्या असंख्य चाहत्यांनी याप्रसंगी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात स्थानिक नेत्यांचाही समावेश होता. काँग्रेसला बळकट करण्याचा विश्वास याप्रसंगी आंध्र प्रदेशातील नेत्यांनी व्यक्त केला. आंध्र प्रदेशचे प्रभारी आेमन चंडी, प्रदेश काँग्रेसचे प्रमुख रघुवीरा रेड्डी, माजी केंद्रीय मंत्री एम.एम. पल्लम राजू यांचीही पक्ष प्रवेशावेळी हजेरी होती. संयुक्त आंध्र प्रदेशचे समर्थक म्हणून किरण रेड्डी यांची आेळख आहे. त्यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती. परंतु त्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. किरण रेड्डी यांचे धाकटे भाऊ किशोर रेड्डी यांनी काही महिन्यांपूर्वीच टीडीपीमध्ये प्रवेश केला होता. 


रेड्डी मुख्यमंत्री असताना राज्याच्या विकासासाठी चांगले निर्णयही घेतले. त्यातही मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी निर्णय घेतले होते, असे चंडी यांनी या प्रसंगी सांगितले. 


आंध्र प्रदेशवर अन्याय

आंध्र प्रदेशातील जनतेचे अनेक प्रश्न अद्याप सोडवले गेले नाहीत. काँग्रेसचे सरकार दिल्लीत येत नाही तोपर्यंत आंध्रचे प्रश्न सुटू शकत नाहीत. काँग्रेसचे सरकार आल्यावर राज्याला विशेष दर्जा, राज्यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाऊ शकते. विद्यमान सरकार तसेच विरोधी पक्षालादेखील अनेक मागण्यांची पूर्तता करण्यात यश आलेले नाही, असा आरोप रेड्डी यांनी केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...