आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarati Draupadi, Marudhayanti Jivo Books Soon In Marathi; Information About Chintan Seth

गुजराती ‘द्रौपदी’, ‘मरुध्यायन्ति जीवो’ पुस्तके लवकरच मराठीत; चिंतन सेठ यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराजा सयाजीराव गायकवाड संमेलननगरी (बडाेदा)- मराठी आणि गुजराती भाषांमधील उत्तम साहित्याचा परस्पर अनुवाद होऊन दोन्ही भाषांतील अभिजात साहित्यकृती मराठी आणि गुजराती वाचकांपर्यंत जाण्याचा मार्ग आता प्रशस्त होण्याची चिन्हे आहेत. त्याचे पहिले पाऊल बडोदे येथील साहित्य संमेलनात टाकले गेले आहे. नजीकच्या भविष्यात ‘द्रौपदी’ आणि ‘मरुध्यायन्ति जीवो’ या दोन गुजराती अभिजात साहित्यकृती मराठी भाषेत अनुवादित होऊन वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत.    


गुजरातमधील सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या ‘आर आर सेठ अँड कंपनी’ या प्रकाशन संस्थेने या अनुवादांसाठी पुढाकार घेतला आहे.  या संस्थेचे संचालक चिंतन सेठ यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली. आर. आर. सेठ अँड कंपनी ही प्रकाशन संस्था गेल्या ९२ वर्षांपासून कार्यरत आहे. सेठ यांची तिसरी पिढी सध्या संस्थेत कार्यरत आहे. एवढ्या वर्षांच्या काळात आम्ही सुमारे सात हजार शीर्षके (टायटल्स) प्रकाशित केली आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे चिंतन सेठ म्हणाले.  अनुवादांना प्रोत्साहन मिळावे या भूमिकेतूनच आम्ही एकूण दहा टायटल्स  अनुवाद प्रक्रियेसाठी पाठवली होती. त्यातील दोन पुस्तकांसाठी आम्हाला होकार मिळाला आहे. मात्र कराराविषयीच्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्याशिवाय मराठी प्रकाशकांचे नाव जाहीर करता येणार नाही, येईल, असे चिंतन सेठ म्हणाले.    

 

वाचकांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार साहित्य
गुजराती भाषेतील साहित्यविश्वात  ‘द्रौपदी’ ही काजल ओझा वैद्य लिखित कादंबरी अभिजात साहित्य मानली जाते. तसेच गुणवंत शहा लिखित ‘मरुध्यायन्ति जीवो’ ही साहित्यकृतीही दर्जेदार वाचकांच्या पसंतीची आहे. त्यामुळे  सुरुवातीच्या टप्प्यात या दोन साहित्यकृतींचा मराठी भाषेत अनुवाद करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

 

भव्य पुस्तक प्रदर्शन  
गुजरात सरकारच्या वतीने अहमदाबाद, सुरत इथे भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले जाते आणि तिथे सुमारे दोन कोटी रुपयांचा ग्रंथव्यवहार होतो हे मला  वाचन संस्कृतीच्या  दृष्टीने सकारात्मक लक्षण वाटते. शिवाय छोट्या स्तरावरही ग्रंथप्रदर्शने आयोजित केली जातात.  
- चिंतन सेठ, संचालक   

 

मराठीतील हे अनुवाद गुजरातीत लोकप्रिय   
मराठी भाषेतील वि. स. खांडेकर, साने गुरुजी, गो. नी. दांडेकर, शिवाजी सावंत, विश्वास पाटील यांची महत्त्वाची सर्व पुस्तके आम्हीच गुजराती भाषेत प्रकाशित केली आहेत. गुजराती भाषेत ही पुस्तके अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या  गुजरातीतही अनेक आवृत्त्या  प्रकाशित झाल्या आहेत. खांडेकरांची ज्ञानपीठ सन्मानप्राप्त ‘ययाती’ या कादंबरीच्या  वीसहून अधिक आवृत्त्या गुजराती भाषेत प्रकाशित झाल्या आहेत, तर शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’च्या  बारा आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ‘महानायक’  या विश्वास पाटील यांच्या  कादंबरीची पुनर्मुद्रित आवृत्तीही लवकरच दाखल होणार आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...