आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडू हिंसाचार: DMK अध्यक्ष स्टॅलिन, कनिमोझी यांना अटक; राज्यव्यापी बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- तामिळनाडूमध्ये स्टरलाइट हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने करणारे द्रमुकचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलिन, पक्षाच्या राज्यसभा सदस्य कनिमोझी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना आज (शुक्रवार) पोलिसांनी अटक केली.

 

द्रमुकने शुक्रवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, स्टरलाइट कंपनीतील तांब्याच्या संयंत्राला बंद करण्याची मागणी   त्यांनी लावून धरली. मदुरांतकम येथील निदर्शनादरम्यान स्टॅलिन यांना अटक झाली. या भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ते एका विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. तेव्हा पोलिसांनी समारंभानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांवर ही कारवाई केली. स्टॅलिन व त्यांच्या कार्यकर्त्यांना विवाह समारंभाच्या हॉलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरा त्यांची सुटका केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.


दुसरीकडे द्रमुक तसेच इतर सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करण्यासाठी चेन्नईत अनेक ठिकाणी निदर्शने केली. त्यामुळे चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी याच मुद्द्यावर राज्यातील वेगवेगळ्या भागांत आंदोलन करून बंदला पाठिंबा दर्शवला. डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियासह विविध विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बंदच्या समर्थनासाठी निदर्शने केली.  

 

चौकशी अमान्य  
स्टरलाइट बाहेर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी. परंतु राज्य सरकारने 23 मे रोजी निवृत्त न्यायमूर्ती अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याचे जाहीर केले. मात्र, ही चौकशी आम्हाला मान्य नाही, असे स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.  
 
बंद प्रायोजित : पलानीस्वामी  
द्रमुकच्या नेतृत्वाखालील राज्यव्यापी बंद हा विरोधी पक्षांनी प्रायोजित केल्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी म्हटले आहे.  
 
हिंसाचार थांबला  
तुतिकोरिनमध्ये 22 व 23 मे रोजी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. सुदैवाने शुक्रवारी शहरात हिंसाचाराचे वृत्त नाही. काही भागात पोलिस संरक्षणाखाली बस वाहतूक सुरू होती. प्रादेशिक परिवहन सेवा सुरू राहिल्याने चाकरमान्यांची गैरसोय झाली नाही, असा दावा प्रशासनाने केला. 

 

बंदमध्ये सहभागी पक्ष  
काँग्रेस, आययूएमएल, एमडीएमके, व्हीसीके, भाकप, माकप, एमएमके या सहकारी पक्षांनी द्रमुकच्या आंदोलनास पाठिंबा देत राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...