आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणण्यासारखी स्थिती सध्या आहे का ते विश्वासाने सांगता येत नाही: राम माधव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी सरकारचे समर्थन काढणे, २०१९ ची निवडणूक, कलम ३७०, दहशतवादी व काश्मिरी पंडित आदी मुद्द्यांवर भाजप महासचिव व जम्मू-काश्मीर-ईशान्येकडील राज्यांचे प्रभारी राम माधव यांच्याशी ‘भास्कर’ चेे धर्मेंद्र सिंह भदौरिया यांनी बातचीत केली.


प्रश्न - काश्मिरात पीडीपीचे समर्थन का काढले? पक्षाने अद्याप ठोस कारण दिले नाही?  
उत्तर -
तीन उद्देश समोर ठेवून युती झाली होती. यात तडजोड न करता दहशतवादापासून मुक्ती, दुसरा उद्देश स्वच्छ प्रशासन व भ्रष्टाचारमुक्त सरकार आणि तिसरा उद्देश म्हणजे उत्तम विकासासाठी बांधील राहणे. विचारधारेत अंतर असू शकते. पण या तिन्ही मुद्द्यांवर आम्ही सहमत होतो. दहशतवादाविरुद्ध चांगली कामगिरी होत होती. लष्कराने तीन वर्षांत ६०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. केंद्र सरकारने ८० हजार कोटी रुपये दिले. परंतु विकास व सुशासन देण्यात मित्रपक्ष (पीडीपी) कमी पडल्याचे जाणवले. उद्दिष्टपूर्तीच होत नसेल तर युती ठेवण्यात काय अर्थ उरला? आम्ही सरकारमधून बाहेर पडलो आहोत. पण काश्मीर सोडलेले नाही.


प्रश्न - प्रत्येक निर्णयात तुम्ही सोबत होता, पण जबाबदारी घ्यायची तेव्हा व निवडणुकीच्या तोंडावर समर्थन काढून घेतले?
उत्तर -
हा आरोप चुकीचा आहे. निवडणूक समोर असताना सरकारमधून बाहेर पडणे फायद्याचे नाही. समर्थन काढून घेण्यात निवडणुकीचे किंवा राजकीय कारण नव्हते. ड्रायव्हर सीटवर पीडीपी पक्ष होता. मुख्यमंत्री त्यांचा असताना सरकार मात्र दिसत नव्हते. जम्मूत आम्ही निदान काहीतरी करत होतो.  आमच्या मंत्र्यांनी शक्य तेवढे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. 


प्रश्न - याचाच अर्थ तेथे भ्रष्टाचार होता? 
उत्तर -
मी कुठली एक व्यक्ती किंवा राजकीय नेतृत्वाबद्दल बोलत नाही. राज्यातील प्रशासनात हळूहळू भ्रष्टाचार वाढत चालल्याचा आरोप होत होता. यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे होते.


प्रश्न - युद्धबंदीला तुमची सहमती होती?
उत्तर -
सरकारमधील प्रमुख लोक व गृहमंत्र्यांनी पूर्ण विचार करून एक महिन्याचा वेळ दिला होता. दहशतवाद्यांकडून चांगली प्रतिक्रिया तर मिळणार नव्हती. पण हुरियतसारखे फुटीरतावादी याला संधीच्या रूपात पाहतील, असे वाटले. पण एक महिन्यात दहशतवादी लोकांना ठार करत होते. पोलिस ठाण्यात बसलेला निष्पाप कर्मचारी काही संबंध नसताना मारला गेला. प्रख्यात पत्रकार शुजात बुखारींना संपवण्यात आले. यावर फुटीरतावाद्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. 


प्रश्न - खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनावर साडेतीन वर्षांत ब्र शब्दही उच्चारला नाही? 
उत्तर -
हे चुकीचे आहे. काश्मिरी पंडितांनी खाेऱ्यात परतावे यासाठी मुफ्तीसाहेब मुख्यमंत्री असतानाच बैठक झाली. कायदा-सुव्यवस्था पाहता त्यांना येथे परत आणणे शक्य आहे का? याबाबत आम्ही पूर्णपणे सहमत नाही. भाजपला बाजूला ठेवून मेहबूबाजींनी बोलणे सुरू कले होते. सर्व पंडित कर्मचाऱ्यांसाठी कॉलनी बनवली. पण तेथे जाऊन राहण्यासारखी स्थिती नाही. 


प्रश्न : कलम ३७० वर काही झाले नाही? 
उत्तर :
आम्ही वारंवार हेच म्हणत आहोत की, कलम ३७० बाबत भाजपची कटिबद्धता कायम आहे. पण त्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकार करणार नाही. त्याचा निर्णय येथे होतो (दिल्लीत). राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा संसदेच्या स्तरावर निर्णय होतो. भाजपचे ते मत स्पष्ट आहे. 
 

प्रश्न : काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना सोडून दिले, त्यावरही तर काही म्हटलेले नाही? 
उत्तर :
ते योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवे. प्रथमच दगडफेक करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला. हे समजून घ्यायला हवे की, दगडफेक करणारा तुरुंगात राहत नाही. दगडफेक करतो, गुन्हा दाखल होतो, तुरुंगात जातो, जामीन मिळतो आणि बाहेर येतो. ९०% प्रकरणांत ती मुले बाहेरच आहेत. तीन-चार वर्षांत पुन्हा दगडफेक केली नाही, प्रथमच काही कारणांमुळे केली होती. अनेकांचे वय १५,१६,१७ वर्षे आहे. त्यामुळे त्यांना एक संधी देऊ, असा विचार केंद्र आणि राज्य सरकारने केला. ज्यांनी दुसऱ्यांदा दगडफेक केली त्यांच्यावरील गुन्हा मागे घेतलेला नाही. हा सरकारचा निर्णय होता. राज्यातील आमच्या पक्षाची त्याविरोधात भूमिका होती. 
 

प्रश्न : काश्मीर ही राजकीय समस्या आहे, सामाजिक समस्या आहे की सुरक्षेची समस्या आहे? 
उत्तर :
काश्मिरात दहशतवादाची समस्या आहे. ज्या दिवशी दहशतवाद संपेल त्या दिवशी इतर मुद्दे सोडवता येऊ शकतील. बंदूक-शस्त्रे हातात घेणे ही काश्मीरची खरी समस्या आहे. त्यामुळे शेवटच्या अतिरेक्याला संपवणे हे आमचे लक्ष्य आहे. 


प्रश्न : दहशतवाद ही समस्या आहे तर ज्याला त्याची माहिती आहे असा राज्यपाल का नाही? तेथे १० वर्षांपासून जे राज्यपाल आहेत, ते नोकरशहा आहेत? 
उत्तर :
तेथे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी लष्कर, निमलष्करी दल, जम्मू-काश्मीर पोलिस आणि प्रशासन आहे. एका व्यक्तीद्वारे जम्मू-काश्मीर चालत नाही. 
 

प्रश्न : संघातून येऊनही तुम्ही ईशान्य व जम्मू-काश्मीरचे प्रभारी असताना भाजपच्या विचारसरणीच्या विरोधातील पक्षांशी समझोता केला. पक्षासाठी सत्ता एवढी महत्त्वाची झाली का? 
उत्तर :
विचारसरणीपेक्षा एकदम विरोधी समझोता करण्याची परिस्थिती फक्त जम्मू-काश्मीरमध्ये झाली. एवढ्या मोठ्या जनमताला नकार देऊन पुन्हा निवडणूक घ्यायची की जनमताचा सन्मान करून काही मुद्द्यांवर सहमती तयार करून पुढे जायचे, असा प्रश्न आमच्यासमोर होता. तीन वर्षे प्रयत्न केला. आता कठीण होत आहे असे वाटल्यावर एक क्षणही संकोच न करता सरकारमधून बाहेर पडलो. 
 

प्रश्न : भाजपने काश्मीरमध्ये पीडीपीच्या होकारात होकार भरला. कधी कुठल्या निर्णयाला विरोध केला नाही. पाठिंबा मागे घेतल्यानंतर आता तुम्ही लोक जास्त टीका करत आहात? 
उत्तर :
आम्ही आघाडी सरकार चालवत होतो. ज्या मुद्द्यांवर विरोध करायचा होता, तेथे आमच्या मंत्र्यांनी उघड विरोध केला. ज्या मुद्द्यांवर आग्रह धरायचा होता तेथे तो धरला. त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले. 
 

प्रश्न : राज्य आणि केंद्रातही तुमच्याच पक्षाचे सरकार होते. काश्मीरमध्ये कोणता बदल घडवण्यात यशस्वी ठरले? 
उत्तर :
मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचा सफाया केला. विकासाच्या मुद्द्यावर जम्मूत जास्त काम करू शकलो. जेथे शांतता आहे तेथे आमच्या मंत्र्यांनी विकासाची खूप कामे केली. तेथे वीज, उद्योग, पायाभूत विकास, जम्मूची मुख्य नदी तवी नदीचे सौंदर्यीकरण केले. आम्ही एम्स, आयआयटी, आयआयएम जम्मूत आणले. श्रीनगर आणि जम्मूला स्मार्ट सिटी घोषित केले आहे. 
 

प्रश्न : काश्मीरमध्ये पहिल्या दिवसापासूनच बदनामीशिवाय काही मिळाले नाही. अशी आघाडी का केली? 
उत्तर :
चुकीचे आहे. एका मोठ्या वर्गाने सरकारकडे आशेच्या रूपाने पाहिले की भविष्यात भाजप जम्मू-काश्मीरमध्येही सत्तेत येऊ शकतो. त्याचे काही फायदे आहेत. जम्मू-लडाखच्या हितासाठी काम करण्याची संधी मिळाली. 
 

प्रश्न : सर्जिकल स्ट्राइक खूप चांगले आणि धाडसी पाऊल होते, पण पुन्हा स्ट्राइक झाला नाही? 
उत्तर :
सर्जिकल स्ट्राइकनंतर जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून घुसखोरी खूप कमी झाली आहे. राज्यात काही दहशतवादी होते, त्यांना शस्त्रे मिळत नव्हती. अतिरेक्याने वॉचमनची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला, अशी बातमी तुम्ही ऐकली असेल. वॉचमनजवळ तर थ्री नॉट थ्रीची रायफल असते. अतिरेकी ती हिसकावत होता, कारण बाहेरून शस्त्रे येणे बंद झाले. पैसाही येत नव्हता. त्यामुळे दहशतवादावर नियंत्रण मिळवणे सोपे झाले. एकेकाळी काश्मीरमध्ये तीन हजारपेक्षा जास्त दहशतवादी फिरत होते, आज ३०० ही नाहीत. 
 

प्रश्न : २०१९ साठी तुमचे लक्ष्य काय? 
उत्तर :
मी जम्मू-काश्मीर, ईशान्येच्या राज्यांचे काम पाहतो. आंध्र माझे गृहराज्य. या राज्यांत भाजपला २०१४ पेक्षा जास्त जागा मिळतील 
 

प्रश्न : तेथे किती जागा मिळतील? 
उत्तर :
आकडा सांगणार नाही, पण सर्वाधिक जागा याच भागांतून आणू. दक्षिण आणि पूर्व भारतात मोठ्या संख्येने जागा मिळतील. २८२ पेक्षा पुढे जाऊ. ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र, केरळ, तेलंगण, तामिळनाडू, ईशान्येत संख्या वाढेल. ईशान्येत सध्या ८ जागा आहेत, आम्ही १५ पेक्षा जास्त जागा आणू. 


प्रश्न : पीडीपीचे अनेक आमदार तुमच्या संपर्कात आहेत. भविष्यात भाजप आणि पीडीपीपासून वेगळ्या झालेल्या पक्षाचे सरकार दिसेल का? 
उत्तर : (मध्येच रोखत) : तसा विचार नाही, प्रयत्नही नाही. काही काळ राज्यपाल राजवट हवी. तीन आघाड्यांवर जी कामे आम्ही करू शकलो नाहीत ती व्हायला हवीत, तोच आमचा एकमेव प्रयत्न आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...