आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्यांना जिवंत पकडा; सुरक्षा दलांचा नवा मंत्र;वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती.

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - दहशतवादी संघटनांत नव्याने भरती झालेल्यांना जिवंत पकडा आणि त्यांना आपापल्या कुटुंबात परत जाण्यासाठी प्रोत्साहित करा, असा नवा मंत्र जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दलांना देण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.  


या अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्यांचे जाळे उद्ध्वस्त करणे हा त्यामागील हेतू आहे. या जाळ्यातील लोकच तरुणांना भडकवतात आणि त्यांना जिहादसाठी प्रवृत्त करतात. त्यामुळे अशा लोकांना जिवंत पकडायचे आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या, असा आमचा प्रयत्न आहे.

  
रमजानच्या काळात कुठलीही कारवाई करायची नाही, असे आदेश केंद्र सरकारने सुरक्षा दलांना दिले आहेत. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमद आणि हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानमधील दहशतवादी गटांत भरती होण्यासाठी सद्दाम पद्दार, इसा फजल आणि समीर टायगर हे तिन्ही कुख्यात दहशतवादी तरुणांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे आता त्यांच्यासारख्या कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची गरज आहे. सुरक्षा दलांनी अलीकडच्या काळात ७० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात अनेक म्होरक्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता धोरणात थोडा बदल केला जात आहे.  


या अधिकाऱ्याने सांगितले की, गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाई करणे तर सुरू राहीलच, पण नव्याने भरती झालेल्या तरुण दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यावर आमचा भर राहील. अशा अनेक दहशतवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची इच्छा असल्याची माहिती आमच्या गोपनीय सूत्रांकडून मिळाली आहे. अनेक पालकांनीही आमच्याशी संपर्क साधला आहे. या तरुणांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करावे आणि पुन्हा सामान्य जीवन जगावे यासाठी त्यांना मदत करण्यात आम्हाला कुठलीही अडचण नाही.  


काश्मीर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक स्वयंप्रकाश पणी यांनी सांगितले की, गेल्या सात महिन्यांत नव्याने भरती झालेल्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर एक जण पुन्हा मुख्य प्रवाहात परतला आहे. दिशाभूल झालेल्या तरुणांनी परत आपापल्या कुटुंबात यावे, असे आवाहन आमचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी केले आहे. मीही तसेच आवाहन करत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...