आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्य भरतीचा पेपर फोडण्यासाठी पैशांची लालूच; जवानावर गुन्हा, मेजरशी वारंवार संपर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो... - Divya Marathi
सांकेतिक फोटो...

दाणापूर- सैन्य भरतीसाठी सामान्य प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी अधिकाऱ्यांना पैशांची लालूच दाखवणाऱ्या जवानांच्या विरोधात लष्कराने दाणापूर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. बीआरसीचे अॅडजुटेंट मेजर अभिषेककुमार यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, हवालदार हरीशकुमार राय आणि सूत्रधार टुनू याने  मेजर के. टी. मॅथ्यूज यांना प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी पैशांची लालूच दिली. दोघांनी २२ ते २३  फेब्रुवारी दरम्यान अनेकदा मेजर मॅथ्यूज व त्यांच्या सहायकाशी संपर्क साधला. आरोपी जवानांचा मोबाइल पोलिसांकडे दिला आहे. त्याची तपासणी होत आहे. या प्रकरणात सूत्रधार टुनूची माहिती काढली जात आहे. ठाणेप्रमुख संदीपकुमारसिंग यांनी सांगितले, लष्करातील अधिकारी व आरोपी हवालदारांची चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. रविवारी घेण्यात येणाऱ्या सामान्य प्रवेश परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फोडल्याची माहिती मिळाल्याने लष्करी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.  

 

एका सहायकाने केली आत्महत्या
मेजर के. टी. मॅथ्यूजचा सहायक आणि १६ बिहारचा जवान देवेंद्रकुमार याने १ ऑक्टोबर २०१७ रोजी आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह मेजर के. टी. मॅथ्यूजच्या वैशाली एन्क्लेव्ह अधिकारी निवासाच्या मागील बाजूस असलेल्या नोकराच्या निवासात आढळला होता. पोलिसांनी केेलेल्या तपासात या जवानाने आत्महत्या केल्याचे सांगितले. मृत्यूपूर्वी जवानाने अाईला पश्चाताप झाल्याची चिठ्ठी लिहिली होती. 

 

संपूर्ण प्रकरणात काही गंभीर प्रश्न अनुत्तरित
तपासात सैन्यदलात नसलेला आरोपी टुनू यास परीक्षेशी संबंधित अधिकाऱ्यांची माहिती कोठून मिळाली? या पूर्वीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या लष्करातील हवालदारांची चौकशी करण्यास परवानगी का देण्यात आली नाही? असे प्रश्न अनुत्तरित आहेत. 

 

यापूर्वीही  सहभाग होता
याआधी लष्करात सैन्य भरतीसाठी रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील मुन्नाकुमार, राहुलकुमार, नितीशकुमार आणि विक्कीला शहापूर पोलिसांनी पकडले होते. चौकशीत टोळीचा सूत्रधार मुन्नाकुमारने पोलिसांना सांगितले, भरती करण्यासाठी उमेदवारांकडून २ ते ५ लाख रुपये घेतले जात होतेे. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी विभागीय भरती मुख्यालयातील दोन हवालदारांची नावे समोर आली. ते उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासणी तसेच लेखी परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी मदत करत होते. दोघांनाही या प्रकरणी आरोपी करण्यात आले. परंतु लष्करी अधिकाऱ्यांनी यासंबंधात काही पुरावे नसल्याने पोलिसांना त्यांची चौकशी करण्यास नकार दिला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट असून आरोपी हवालदारांना जामीन मिळाला आहे.

 

अर्धा डझन उमेदवारांच्या संपर्कात होते आरोपी  
लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात अशी माहिती मिळाली की, प्रश्नपत्रिका फोडण्याच्या मोहिमेतील दोन्ही आरोपी अर्धा डझन उमेदवारांच्या संपर्कात होते. काही उमेदवारांकडून त्यांनी पैसेही घेतले होते. यापूर्वी झालेल्या भरतीत अपयशी ठरलेल्या उमेदवारांनी आरोपींकडे पुन्हा भरती होण्यासाठी वशिलाही लावला .

बातम्या आणखी आहेत...