आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षी 213 अतिरेक्यांचा खात्मा; मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची विधानसभेत माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर भागात झालेल्या विविध लष्करी कारवायांत २१३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. परंतु हल्ले व चकमकीदरम्यान किमान ५३ नागरिकांना प्राण गमावावे लागले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.  


मेहबूबा म्हणाल्या, २१३ दहशतवाद्यांत १२७ परदेशी, तर ८६ स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. एकाच वर्षात दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईत आलेले हे मोठे यश आहे. २०१६ च्या तुलनेत हे यश मोठे आहे. तेव्हा ११९ परदेशी व ३१ स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. सरकारने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी व्यापक पातळीवर सुरक्षा व खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या आहेत. त्यात वीज तारांचे कुुंपण तयार करणे, रात्रीच्या वेळी पाहता येणारी उपकरणे, लक्ष्य भेद करणारी सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली. भाजपचे आमदार शर्मा यांच्या प्रश्नावर एका लेखी उत्तरात त्यांनी भूमिका स्पष्ट केली.  

 

आठ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी सभात्याग  

काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ८ वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात विरोधी पक्षाने गुरुवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत सभात्याग केला. पोलिसांना बुधवारी या मुलीचा मृतदेह सापडला. दोषींना कडक शिक्षा दिली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे, असे मुफ्ती यांनी ट्विट करून सांगितले. गेल्या सात दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती. पोलिसांना तिचा शोध घेण्यात अपयश आले. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार मियान अल्ताफ यांनी केली. काँग्रेसनेही सभागृहात ही मागणी चांगलीच लावून धरली. 

 

धडक कारवाईत मोठा साठा जप्त  
 गेल्या दोन वर्षांत सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ८ किलो ग्रॅम स्फोटके जप्त करण्यात आली. २०१६ मध्ये १० किलो स्फोटके जप्त झाली आहे. त्याशिवाय ४६ वायरलेस उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. २०१६ मध्ये ५४ उपकरणे आढळून आली.  


११ हजारांवर अटकेत
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षांत दगडफेक करणाऱ्या ११ हजार २९० जणांना अटक करण्यात आली होती. परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. दगडफेकीच्या विविध घटनांत आतापर्यंत ३ हजार ७७३ जणांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. त्यावरून संताप होता. 

 

बातम्या आणखी आहेत...