आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्सल मराठी मातीचा सुगंध ल्यालेल्या ‘बोलीकविता’ रंगल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराजा सयाजीराव गायकवाड संमेलननगरी- प्रमाण भाषेच्या  कृत्रिमतेचा, व्यावहारिक रोकडेपणाचा लवलेशही नसलेल्या, पण अस्सल मातीचा सुगंध लेवून आलेल्या  ‘बोलीकविता’ साहित्य  संमेलनाच्या  समारोपापूर्वी रंगल्या आणि श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेल्या. नितीन देशमुखांची वऱ्हाडी   बोली, रमेश पोतदार यांची अहिराणी बोली, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांची मिश्र बोली, भास्कर ज्ञानदेव भोसले यांची  पारधी बोली, स्मिता पाटील यांची  वाडवळ बोली, वीरा राठोडांची लमाणी बोली या महाराष्ट्री बोलींच्या जोडीने दलपत  पढियार यांची  चरोतरी बोली आणि डॉ. निरंजन राजगुरू यांची  काठियावाडी बोलीतील कविताही दाद मिळवून गेली.    


माय महान महान साया जगाचं म्हननं  
बाप लहान लहान, कहा मानलं लहान.. असा सवाल विचारत देशमुखांच्या वऱ्हाडी बोलीनं  ‘आज’च्या  बापाचं  काळीज उलगडून दाखवलं, तर भोसले यांच्या  पारधी बोलीतील कवितेनं भटक्या आणि गुन्हेगारी ठरवल्या  गेलेल्या  समाजघटकांचे वास्तव मांडले. कष्टकऱ्यांच्या  वेदनांचे प्रतिबिंब पोतदारांच्या अहिराणी बोलीतील कवितेत प्रकट झालं होतं. ‘गेले सोडून कौलाले वासे..’ ही त्यांची खंत ‘हलवलेला गाव’ या बोलीकवितेतून व्यक्त झाली. नव्या काळाने जुन्या सुंदर गोष्टी कसा ओरबाडून नेल्या याचं चटका लावणारं दर्शन त्यात घडलं. स्मिता पाटील यांनी वाडवळी बोलीत कविता ऐकवल्या. डहाणू, पालघर, वसई परिसरातील त्यांची बोली ‘मातीखालच्या बियांना’ आवाहन करणारी आणि  जाणत्या केळीनं नवोढा केळीला सांगितलेलं  जीवनदर्शन अंतर्मुख करणारं होतं. चरोतरी व काठियावाडी बोलीतून गुजरातचे ग्रामीण वास्तव समोर आले.    

बातम्या आणखी आहेत...