आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मा पाटलांचा विषय संमेलनातही गाजला; सर्वच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सरकारने साेडवावेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराजा सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी (बडाेदा)- धर्मा  पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्यास  मंत्रालयात  विष पिऊन आत्महत्या करण्याची वेळ येते. ही बाब सरकार शेतकऱ्यांच्या  प्रश्नाबाबत  संवेदनशील नाही हे स्पष्ट करणारी आहे. या असंवेदनशीलतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यातील सर्वच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सरकारने संवेदनशीलतेने समजून घ्यावेत आणि प्रामाणिकपणे सोडवावेत, पैठण येथील संतपीठ त्वरित कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी खुल्या अधिवेशनात  करत रविवारी ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सांगता झाली.  


खुल्या अधिवेशनात  संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १६ ठराव मांडण्यात आले. धर्मा पाटील यांच्याविषयीचा  मुद्दा देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातही मांडला होता. त्याला पूरक असा ठराव करत साहित्य महामंडळाने आपली संवेदनशीलताही दाखवून दिली. 

बारावीपर्यंत मराठीची सक्ती हवी : चपळगावकर
‘शिक्षणात बारावीपर्यंत मराठीची सक्ती असावीच.  इंग्रजीतून शिक्षण हा पालक अाणि विद्यार्थ्यांचाच अट्टहास अाहे. मूळ कायद्यातही माध्यमिक शिक्षण ही सरकारची जबाबदारी अाहे. सरकारने ती जिल्हा परिषदांवर टाकली. मी तर म्हणताे की, सरकारनं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संपूर्ण मराठी माध्यमाच्या अादर्श शाळा चालवाव्या,’ असे मत माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी रविवारी साहित्य संमेलनात व्यक्त केले.

 

अन्य ठराव असे  
- सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या  वेतनश्रेणीचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवावा आणि त्यांना निवृत्तिवेतन लागू करावे. अनुदानात तिप्पट वाढ करावी 
- बालभारतीचे समायोजन विद्या प्राधिकरणात न करता स्वायत्तता कायम ठेवावी 
- राज्य विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांची जी नेमणूक होते त्यावर राजकीय व्यक्तींचे वर्चस्व दिसून येते. त्या जागांवर सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती व्हावी 
- उपयोजित क्षेत्रात मराठीची सद्य:स्थिती काय आहे, याचा वस्तुनिष्ठ अहवाल करून त्याविषयीची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी 
- पैठण येथील संतपीठ त्वरित कार्यान्वित करण्यात यावे.
- गुजरात मराठी अकादमीची सुरुवात अविलंब करावी.
- गुजरातची महाविद्यालये, विद्यापीठांतून दुसरी भाषा म्हणून मराठी शिकवावी.  { बृहन्महाराष्ट्रातील ज्या संस्था मराठी भाषा व संस्कृती संवर्धनाचे कार्य करत आहेत, त्यांना शासनाने तीन लक्ष रुपयांचे अनुदान दरवर्षी द्यावे 
-  रोजगारासाठी गुजरातेत येणाऱ्या महाराष्ट्रातील मागासवर्गीयांना महाराष्ट्रात मिळणाऱ्या सुविधा गुजरात सरकारनेही द्याव्यात  
-  बडोद्यात स्वतंत्र अनुवाद अकादमीची स्थापना करावी 
-  मराठी लर्निंग अॅक्ट त्वरित संमत करावा 
-  बडोद्यातील विमानतळास सयाजीरावांचे नाव द्यावे 
-  सयाजीरावांना भारतरत्न सन्मान बहाल करावा 
- सीमावर्ती राज्यांनी मराठी अकादमी स्थापन करावी, शासनाने पुढाकार घ्यावा 

बातम्या आणखी आहेत...