आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहा म्हणाले-आघाडी अभेद्य; सर्व जागा जिंकू, पण नितीश यांचे मौन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीमुळे झालेला पराभव आणि पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आता आघाडीतील सहकारी पक्षांना एकजूट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच मोहिमेअंतर्गत भाजप अध्यक्ष अमित शहा गुरुवारी बिहारला गेले. पाटण्याच्या राज्य विश्रामगृहात त्यांनी सर्वात आधी आघाडीतील सहकारी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली. दोघांनी नाष्टा केला. दोन्ही नेत्यांनी जागा वाटपाबाबतही चर्चा केली, असे मानले जात आहे. ही भेट ४५ मिनिटे चालली. चर्चेनंतर नितीशकुमार बाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर चुप्पी साधली. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. दुसरीकडे शहा म्हणाले की, बिहारमध्ये नितीश यांच्यासोबतची युती तुटणार नाही. आम्ही सर्व ४० जागा जिंकू. जागावाटपाबाबत काय चर्चा झाली आणि सहमती झाली की नाही हे मात्र शहा यांनी सांगितले नाही. इतर मुद्द्यांवर नितीश यांच्याशी भोजनाच्या वेळी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. घटक पक्षांना एकजूट ठेवण्याच्या मोहिमेअंतर्गत बुधवारी पंतप्रधान मोदी पंजाबला गेले होते. तेथे त्यांनी आघाडीतील अकाली दलाच्या नेत्यांसह शेतकऱ्यांना संबोधित केले होते. अमित शहा गेल्या ६ जूनला महाराष्ट्रातील नाराज सहकारी पक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी गेले होते. तेव्हा दोघांत १०० मिनिटे बंदद्वार चर्चा झाली होती. 


जागावाटपावरून मतभेद, कारण रालोआचे ४० पैकी ३१ खासदार, जदयूचे दोनच 
भाजपसाठी बिहारमध्ये जागावाटपावरून मतभेद आहेत त्याचे कारण म्हणजे २०१४ मध्ये नितीश यांचा पक्ष रालोआत नव्हता. तेव्हा रालोआने ४० जागांपैकी ३१ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपचे २२, लोक जनशक्ती पक्षाचे ६, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे ३ खासदार आहेत. नितीश यांच्या जदयूचे फक्त दोनच खासदार आहेत. लालूंच्या राजदशी नाते तोडून नितीश यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापले आणि नितीश रालोआत परतले. तेव्हापासून त्यांना बिहारमध्ये मोठ्या भावाची भूमिका हवी आहे. म्हणजे जदयूला राज्यात २५-१५ चे जुने सूत्र हवे आहे. सध्याच्या खासदारांचे गणित घेतले तर जदयूच्या वाट्याला आघाडीत ९ पेक्षा जास्त जागा येणार नाहीत. त्यामुळे जागावाटपात अडचणी येत आहेत. 


जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातही युतीमध्ये पेच 
लोकसभा निवडणुकीत जदयूला कमी जागा देऊन भाजप त्याची भरपाई विधानसभा निवडणुकीत करू शकतो. भाजप या सूत्रानुसार बिहारच्या पुढील विधानसभा निवडणुकीत जदयूसाठी जास्त जागा सोडू शकतो, असे मानले जात आहे. नितीशच सीएम पदाचा चेहरा कायम राहावा हा हेतू. जदयूप्रमाणेच भाजपचे शिवसेनेशीही मतभेद आहेत. महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजप-शिवसेना एकत्र लढले होते. तेव्हा भाजपला ४८ पैकी २२,तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला जास्त जागा हव्या आहेत. 


पेच : नितीश नेते झाल्यास रालोसपा सोडणार साथ 
अमित शहा आणि नितीशकुमार यांची ब्रेकफास्ट आणि डिनर डिप्लोमसी रालोआतील सहकारी पक्ष रालोसपाला आवडली नाही. बिहारमधील रालोआचा घटक पक्ष रालोसपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नागमणी म्हणाले-शहांची नितीश यांच्याशी जवळीक भविष्यासाठी ठीक नाही. ज्यांच्याकडे फक्त दीड टक्का मते आहेत, त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष नाष्टा-जेवण घेत आहेत. नितीश यांना राज्याचा नेता घोषित केल्यास रालोसपा रालोआ सोडून बाहेर पडेल, असा इशारा त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...